Wednesday, June 18, 2025 01:37:12 PM

देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानाला अखेरचा सलाम; ब्राम्हणवाडा गावावर शोककळा

जम्मू-काश्मीरमधील चकमकीत अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाड्याचा सुपुत्र जवान संदीप गायकर शहीद. गावात शोककळा; वीरमरणाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर. संपूर्ण गाव बंद.

देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानाला अखेरचा सलाम ब्राम्हणवाडा गावावर शोककळा

अहिल्यानगर: जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचा सुपुत्र, जवान संदिप पांडुरंग गायकर वीरगतीला प्राप्त झाला. देशासाठी शौर्याने लढताना आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या या जवानाच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी ब्राम्हणवाडा गाव पूर्णतः बंद ठेवण्यात आलं असून ग्रामस्थांनी एकजूट दाखवत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

संदिप गायकर हे लष्करात कार्यरत असून ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक सीमेवर सुरु असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान त्यांनी शत्रूंशी लढत वीरमरण स्वीकारलं. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पांडुरंग गायकर यांचा एकुलता एक मुलगा असलेला संदिप याने भारतमातेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान हे अवर्णनीय आहे.

संदिप यांच्या पश्चात पत्नी दीपा गायकर, आई-वडील आणि नातेवाईक असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोकसागर पसरलेला असतानाच, गावकऱ्यांनी अभिमानाने सांगितलं की, 'आमचा मुलगा देशासाठी शहीद झाला, ही गोष्ट आम्हाला कायमचा अभिमान देणारी आहे.' गावातील सह्याद्री विद्यालय, जिथे संदिप यांनी शिक्षण घेतलं, त्याच ठिकाणी लष्करी इतमामात त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत आहे.

या घटनेमुळे ब्राम्हणवाडा गावातील जनजीवन थांबलं असून, युवकांमध्ये देशसेवेबद्दलचा आदर वाढलेला दिसतो. गावातील ग्रामस्थ, मित्रमंडळी आणि शिक्षकांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 'शांत स्वभावाचा, पण देशासाठी काहीही करण्यास सज्ज असलेला मुलगा आज आपल्यातून निघून गेला,' अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

संदिप गायकर यांच्या शौर्यगाथेला मानाचा मुजरा करत संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली आहे. अशा शूर वीरांच्या बलिदानामुळेच देशाची सुरक्षा अबाधित राहते, हे विसरून चालणार नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीरपुत्राला संपूर्ण महाराष्ट्र कृतज्ञतेने नमन करत आहे.


सम्बन्धित सामग्री