Sunday, July 13, 2025 11:05:59 AM

TasteAtlas Highlights India: टेस्टएटलास यादीत भारताच्या 'या' तीन ब्रेकफास्ट पदार्थांना मानाचं स्थान; जाणून घ्या

TasteAtlas च्या जागतिक यादीत मिसळ, छोले भटुरे आणि पराठा यांना मानाचे स्थान; भारतीय खाद्यसंस्कृतीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्याने अभिमान वाटावा अशी बाब समोर आली आहे.

tasteatlas highlights india टेस्टएटलास यादीत भारताच्या या तीन ब्रेकफास्ट पदार्थांना मानाचं स्थान जाणून घ्या

TasteAtlas Highlights India: भारतीय स्वयंपाकघराची विविधता, चव आणि परंपरा यांची चर्चा आता केवळ देशापुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर जगभरातील खाद्यप्रेमीही भारतीय चवांचे चाहते बनत चालले आहेत. याचेच ताजं उदाहरण म्हणजे, ‘TasteAtlas’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फूड आणि ट्रॅव्हल वेबसाईटने जाहीर केलेल्या जगभरातील 50 सर्वोत्तम ब्रेकफास्ट पदार्थांच्या यादीत भारताच्या तीन खाद्यपदार्थांनी मानाचे स्थान पटकावले आहे.

सगळ्यात खास बाब म्हणजे या यादीत आपली मराठमोळी मिसळदेखील सामील झाली आहे. ती मिसळ जी आपल्या महाराष्ट्रात झणझणीत चव, मसालेदार रस्सा, फरसाण, पाव, बटाट्याची भाजी आणि कांदा-लिंबाच्या सोबतीने खाल्ली जाते, तिच्या स्वादाला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.

हेही वाचा: सुधाकर बडगुजर यांना भाजपाकडून ग्रीन सिग्नल?

मिसळ
मिसळ हा फक्त एक पदार्थ नाही, ती एक भावना आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, मुंबई प्रत्येक ठिकाणी मिसळीचा वेगळा अंदाज, वेगळी चव आणि वेगळा स्टाईल आहे. कोल्हापुरी मिसळ झणझणीत रस्स्यामुळे प्रसिद्ध आहे, तर पुणेरी मिसळ ही थोडी सौम्य पण गोडसर चवीनं ओळखली जाते. एका प्लेटमध्ये इतकं काही मिळतं की जे खाल्ल्यानंतर नाश्ता आणि जेवण दोन्ही झाल्यासारखं वाटतं.

छोले भटुरे आणि पराठा: उत्तर भारताची शान
याच यादीत मिसळ बरोबर उत्तर भारतातील दोन लोकप्रिय ब्रेकफास्ट पदार्थांनीही स्थान मिळवलं आहे; छोले भटुरे आणि पराठा.छोले भटुरे हा पंजाबच्या रस्त्यांपासून हॉटेल्सपर्यंत प्रत्येक ठिकाणी मिळणारा एकदम भरपेट आणि मसालेदार नाश्ता आहे. खमंग भटुरे आणि मसालेदार छोले यांची जोडी म्हणजे स्वर्गसुख. दुसरीकडे, पराठा हा उत्तर भारतात सकाळच्या वेळचा राजा मानला जातो. आलू, गोभी, पनीर किंवा केवळ तूप घालून शेकलेला पराठा, दही किंवा लोणच्याच्या सोबतीने खाल्ला की दिवसच खास होतो.

टेस्ट एटलासची मान्यता
'TasteAtlas' ही वेबसाइट जगभरातील पारंपरिक खाद्यपदार्थांची माहिती देते. तिथे केवळ चव नव्हे, तर त्या पदार्थामागची पारंपरिक कथा, स्थानिक लोकांचा प्रेमभाव, आणि सांस्कृतिक महत्त्व देखील सांगितलं जातं. यंदा त्यांनी तयार केलेल्या ‘Top 50 Breakfast Dishes in the World’ या यादीत मिसळ, छोले भटुरे आणि पराठा या तीन भारतीय पदार्थांची निवड ही अभिमानाची बाब आहे.

हेही वाचा: 'आम्ही मराठी माणसासाठी काम ... ; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर भरत गोगावले यांची जोरदार टीका

भारतीय चवींची जागतिक गोडी
ही मान्यता म्हणजे केवळ पदार्थाचीच नव्हे, तर आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचीही दखल. अगदी साध्या घरगुती स्वयंपाकघरात बनणारे हे पदार्थ आज जगभर चर्चेत आहेत. या यादीमुळे भविष्यात जगभरातील रेस्टॉरंट्समध्ये 'मिसळ पाव' किंवा 'छोले भटुरे' मेनूवर दिसू लागले तर आश्चर्य वाटायला नको.

आज मिसळ पाव, पंजाबचा छोले भटुरे आणि पराठा हे जगभरातील तोंडपाणी आणणारे ब्रेकफास्ट पदार्थ ठरले आहेत. त्यामुळे आता फक्त 'झणझणीत' नाही, तर 'अंतरराष्ट्रीय' मिसळ पाव म्हणायची वेळ आली आहे.
 


सम्बन्धित सामग्री