जळगाव: इंदूर-हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणावरून राज्यातील दोन ज्येष्ठ नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील या महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनावरून दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले असून राजकीय वातावरण तापले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केला की, 'खडसे यांनी जाणीवपूर्वक रस्ता होणार असलेल्या जागेतील शेतजमीन वर्षभरापूर्वी खरेदी केली. या खरेदीचा हेतू मोबदला मिळवण्याचाच होता.' महाजन यांनी यासंबंधी काही पुरावे असल्याचेही सांगितले. 'एका शिक्षकाच्या मुलाकडे एवढी संपत्ती आली कशी?' असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा: लातूरमध्ये महापालिकेची तयारी फोल; मुसळधार पावसाने केला प्रशासनाचा निष्क्रियपणा उघड
यावर प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर उलट आरोप करत म्हटले, 'मी सधन कुटुंबातून आलो आहे. माझ्या नावावर 1959 पासून शेती आहे. माझं भूतकाळ पारदर्शक आहे. उलट महाजन यांच्याच कुटुंबाने धरण होणार असल्याची माहिती मिळताच शेतजमीन खरेदी केली आणि त्यातून दहा कोटी रुपये मोबदला घेतला.' खडसे यांनी असा दावा केला की गिरीश महाजन यांच्याकडे एवढी संपत्ती कशी आली हेच संशयास्पद आहे.
हा वाद केवळ व्यक्तिगत पातळीवर मर्यादित नसून, त्याचा राजकीय संदर्भही मोठा आहे. दोन्ही नेते एकेकाळी भाजपमध्ये एकत्र होते, मात्र खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यामुळे आता हे आरोप-प्रत्यारोप केवळ वैयक्तिक नव्हे, तर पक्षीय संघर्षाचाही भाग असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी महामार्गासाठी संपादित करण्यात आल्यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर खडसे हे शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र महाजन यांनी खडसे यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वादाला नवे वळण मिळाले.