Wednesday, June 18, 2025 03:16:55 PM

Raja Sonam Tragedy: खून, कटकारस्थान आणि विश्वासघात… इंदौरच्या सोनम-राजाच्या प्रेमकथेचा थरारक शेवट

इंदौरच्या सोनम-राजाच्या विवाहानंतर महिन्याभरातच घडलेल्या हत्येच्या कटकारस्थानाने देशभर खळबळ उडवली आहे. प्रेम, फसवणूक, आणि सुपारी खून यांची ही चकित करणारी कहाणी आहे.

raja sonam tragedy खून कटकारस्थान आणि विश्वासघात… इंदौरच्या सोनम-राजाच्या प्रेमकथेचा थरारक शेवट

Raja Sonam Tragedy: मध्य प्रदेशातील इंदौर येथील सोनम आणि राजा यांची कहाणी सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे. 11 मे रोजी झालेल्या विवाहानंतर अवघ्या 30 दिवसांत घडलेल्या घटनांनी दोन सुखी कुटुंबांचा संपूर्णपणे बळी घेतला. आधी दोघे बेपत्ता झाले, मग राजाचा मृतदेह सापडला आणि अखेर सोनमच्या अटकेने सगळ्यांना हादरून सोडलं.

राजा आणि सोनम यांचं लग्न 11 मे 2025 रोजी इंदौरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलं. हे एक अरेंज मॅरेज होतं. दोघंही रघुवंशी समाजातील होते आणि सामाजिक विवाहबुकरच्या माध्यमातून त्यांचं नातं ठरवण्यात आलं. कुंडल्या जुळवण्यात आल्या आणि कुटुंबांच्या संमतीनं विवाह निश्चित झाला. लग्नाचा माहोल अत्यंत आनंददायक होता.

हेही वाचा: माजी सहाय्यक आरोग्य संचालकावर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी मेहेरबान

लग्नानंतर 9 दिवसांनी, म्हणजेच 20 मे रोजी, सोनम आणि राजा हनीमूनसाठी गुवाहाटी व शिलॉंगकडे रवाना झाले. हनीमूनची तिकिटं सोनमने आधीच बुक केली होती. राजा तयार नव्हता, पण सोनमच्या आग्रहामुळे तो तयार झाला.

22 मेपर्यंत दोघंही आपल्या घरच्यांशी नियमित संपर्कात होते. मात्र त्यानंतर अचानक राजाचा फोन बंद झाला. काही काळ सोनमने राजाच्या आईशी संपर्क ठेवला, पण नंतर तीही गायब झाली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. शिलॉंग पोलिसांनी तपास सुरू केला आणि मीडियातून वृत्त प्रसिद्ध होऊ लागली.

2 जूनला राजाचा मृतदेह एका खोल दरीत सापडला. पोलिसांना त्या भागात एक स्कूटी आढळली, जी राजा आणि सोनम वापरत होते. पोस्टमॉर्टेम अहवालानुसार धारदार शस्त्राने हत्या झाल्याचं स्पष्ट झालं.

हेही वाचा: भावासाठी ट्विट केलं, पण नंतर डिलीट केलं? निलेश राणे म्हणाले, 'त्याने मला अधिकार...

9 जून –सोनमची अटक

सोनम उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथील एका ढाब्यावर सापडली. तिने एका व्यक्तीकडून फोन घेऊन आपल्या कुटुंबीयांना संपर्क केला आणि नंतर पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. पोलिसांच्या चौकशीत मेघालय पोलिसांनी सांगितलं की, सोनमनेच पतीच्या हत्येची सुपारी दिली होती.

कोण-कोण अटकेत आहे?

या प्रकरणात सोनमसह चार जण अटकेत आहेत:

  1. राज कुशवाह – सोनमच्या वडिलांच्या फॅक्टरीत काम करणारा, मुख्य सूत्रधार.

  2. आकाश राजपूत – ललितपूर (उत्तर प्रदेश) येथून अटकेत.

  3. आनंद कुर्मी – सागर येथून अटकेत; एमबीए पदवीधारक.

  4. विशाल सिंह चौहान – ललितपूरचा रहिवासी, राज कुशवाहच्या संपर्कात.
     

प्रेम, कट आणि सुपारी

राज कुशवाह आणि सोनम यांची फॅक्टरीमध्ये ओळख झाली आणि ती हळूहळू प्रेमात बदलली. मात्र कुटुंबीयांनी सोनमचं लग्न राजासोबत लावून दिलं. त्यामुळे संतप्त झालेल्या सोनम आणि राज कुशवाहने मिळून राजाची हत्या करण्याचा कट रचला. लग्नानंतर काही दिवसांतच हत्या करण्याचं नियोजन झालं आणि मेघालयमध्ये सुपारी किलर्सच्या मदतीने राजा संपवण्यात आला.

सोनमचा दावा – 'माझं अपहरण झालं'

सोनमने अटकेनंतर सांगितलं की, काही अज्ञात व्यक्तींनी तिचं अपहरण केलं. लुटमार करताना राजाची हत्या झाली आणि तिला जबरदस्तीने घेऊन गेले. काही दिवसांनी गाझीपूरमध्ये सोडून गेले.

मात्र पोलिसांच्या तपासात सोनमच्या कथनात अनेक विसंगती आढळून आल्या आहेत.


सम्बन्धित सामग्री