Sandeep Deshpande: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मनसे आणि भाजप यांच्यातील संभाव्य युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. "आम्ही मुंबईत भाजपसोबत जाणार नाही आणि अशा प्रकारच्या कोणत्याही समर्थनाचा विषय सध्या चर्चेत नाही," असे ठाम प्रतिपादन त्यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना केले.
एमआयजी क्लबमधील बैठकीत रणनीतीवर चर्चा
वांद्रे येथील MIG क्लबमध्ये आज मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राज ठाकरे यांच्यासह मुंबईतील पक्षाचे सर्व पराभूत उमेदवार, विभाग अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे लांबणीवर पडलेली ही बैठक आज पार पडली. यामध्ये विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचे अनुभव आणि पक्षाची भविष्यातील वाटचाल यावर सविस्तर मंथन करण्यात आले.
पक्षांतर्गत बदलांचे संकेत
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना संदीप देशपांडे म्हणाले की, "पक्षांतर्गत मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली आहे, मात्र ते मुद्दे कॅमेरासमोर सांगण्यासारखे नाहीत. पक्षामध्ये काळानुरूप बदल होणे स्वाभाविक आहे आणि तसे बदल आगामी काळात होतीलच." या विधानामुळे मनसेच्या संघटनात्मक बांधणीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - Ujjwal Nikam : 'या घटनेमागे काही षडयंत्र असेल, तर ...', अजित पवार विमान दुर्घटनेनंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
तामिळ वादावर भाजप नेत्यांना फटकारले
राज ठाकरे यांनी तामिळ जनतेबद्दल नाही, तर केवळ भाजप नेते अन्नामलाई यांच्याबद्दल विधान केले होते, असे स्पष्टीकरण देशपांडे यांनी दिले. "भाजपचे तमिळ सेल्वन विनाकारण 'मराठी विरुद्ध तामिळ' असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने आपल्या नेत्यांच्या डोक्यात प्रकाश पाडावा," अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
युतीच्या चर्चा केवळ अफवा
कल्याण-डोंबिवली पाठोपाठ मुंबईतही मनसे सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, "आमची कोणाशीही चर्चा झालेली नाही," असे स्पष्ट करत देशपांडे यांनी युतीच्या शक्यतेवर पडदा टाकला आहे.