Thursday, February 19, 2026 09:06:29 AM

ZP Election 2026: मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही? आता 'हे' अ‍ॅप डाऊनलोड करून घरबसल्या येईल शोधता

या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या मतदार यादीतील आपले नाव, मतदान केंद्र आणि ओळखपत्राचा तपशील शोधता येणार आहे.

zp election 2026 मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही आता हे अ‍ॅप डाऊनलोड करून घरबसल्या येईल शोधता

ZP Election 2026: महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, मतदारांच्या सुविधेसाठी राज्य निवडणूक आयोगाने 'मताधिकार' नावाचे विशेष मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या मतदार यादीतील आपले नाव, मतदान केंद्र आणि ओळखपत्राचा तपशील शोधता येणार आहे. 'गुगल प्ले स्टोअर'वर उपलब्ध असलेल्या या अ‍ॅपमध्ये नाव किंवा EPIC क्रमांक टाकून माहिती मिळवण्याची सोय आहे. याशिवाय mahasecvoterlist.in या अधिकृत संकेतस्थळावरूनही मतदारांना आपली माहिती पडताळता येईल. 7 फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, 9 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडेल.

निवडणूक कार्यक्रमातील बदल आणि राजकीय वातावरण 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातामुळे आणि त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दुखवट्यामुळे निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा दोन दिवसांनी पुढे ढकलल्या आहेत. या राष्ट्रीय शोकामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सर्व नियोजित सभा रद्द केल्या आहेत. अजितदादांच्या निधनामुळे राजकीय प्रचाराला काहीशी खीळ बसली असून, कार्यकर्त्यांमध्येही शोकाकुल वातावरण आहे. असे असले तरी, प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी तांत्रिक तयारी पूर्ण केली असून 7 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडणार आहे.

हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash : विमानाला आग, दादांच्या दोन्ही गुडघ्यातून धूर...; बारामतीच्या सरपंचांनी सांगितला अपघाताआधीचा थरार

लातूरमध्ये मतदार यादीचा धक्कादायक सावळागोंधळ 
दरम्यान, प्रशासन डिजिटल सुविधेचा दावा करत असताना, लातूर जिल्ह्यातील खाडगाव (हरंगुळ गणांतर्गत) येथे मात्र मतदार यादीचा मोठा गोंधळ समोर आला आहे. या गावातील तब्बल 2789 मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचे उघड झाले असून, यामध्ये खुद्द सरपंचांच्या पत्नीसह विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांच्या नावांचाही समावेश आहे. वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या नागरिकांची नावे एकाएकी वगळली गेल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार प्रशासकीय हलगर्जीपणामुळे घडला की जाणीवपूर्वक करण्यात आला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर या गोंधळामुळे लातूरमध्ये तणावाचे वातावरण आहे.
 


सम्बन्धित सामग्री