जळगाव : शहरातील पिंप्राळा रोडवरील एका मॉलमध्ये सुरु असलेल्या स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत धडक छापा टाकला. या छाप्यात चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरचा व्यवस्थापक राजू जाट याला अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळा रोडवरील 03 डे स्पा सेंटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्पाच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळत होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबन अवद यांच्या नेतृत्वाखाली एका डमी ग्राहकाला पाठवण्यात आले. डमी ग्राहकाने आतून पुष्टी दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत रात्री उशिरा छापा टाकला. या छाप्यात चार महिलांची सुटका करण्यात आली असून, त्या सर्व महिला परप्रांतीय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्पा सेंटरवर भारत सरकारच्या मान्यतेने असा उल्लेख असल्यामुळे अनेकांना या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवहाराची कल्पना देखील नव्हती. या फसव्या बोर्डामुळे स्पा सेंटरकडे ग्राहकांचा ओढा वाढवला जात होता, असे पोलिसांनी सांगितले. संबंधित स्पा सेंटरचा मुख्य मालक फरार असून, लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा: सट्ट्यात 60 हजार गमावले; मानसिक तणावात तरुणाची वाशी खाडीत उडी घेऊन आत्महत्या
सध्या पीडित महिलांना जळगाव शहरातील एका विशेष महिलाश्रमात ठेवण्यात आले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या महिलांना कोणत्या मार्गाने, कोणत्या राज्यातून आणले गेले आणि कोणत्या अमिषाने त्यांना फसवले गेले, याचा तपास सुरू केला आहे. त्यांना नोकरीच्या आमिषाने फसवून या व्यवसायात ढकलले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या कारवाईमुळे शहरातील अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांना अशा संशयास्पद स्थळांची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.