JEE Mains 2026 Results: अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'जेईई मेन्स २०२६' (सत्र १) परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) सत्र 1 चे निकाल अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर प्रसिद्ध केले आहेत. परीक्षेला बसलेले लाखो उमेदवार आता त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स म्हणजेच अर्ज क्रमांक (Application Number) आणि पासवर्ड वापरून आपला निकाल आणि स्कोअरकार्ड पाहू शकतात. निकाल जाहीर करण्यापूर्वी आज सकाळीच एनटीएने अंतिम उत्तर सूची (Final Answer Key) देखील वेबसाइटवर उपलब्ध करून दिली होती.
12 तेजस्वी विद्यार्थ्यांची 100 पर्सेटाईलसह बाजी
यावर्षीच्या निकालात 12 उमेदवारांनी 100 पर्सेटाईल गुण मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यामध्ये श्रेयस मिश्रा, नरेंद्रबाबू गरि महित, शुभम कुमार, कबीर छिल्लर, चिरंजीब कर, भावेश पात्रा, अनय जैन, अर्णव गौतम, पासला मोहित, माधव विराडिया, पुरोहित निमय आणि विवान शरद या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या यशाबद्दल देशभरातून गुणवंत विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यात महाराष्ट्रातील माधव विराडिया या विद्यार्थ्याचाही समावेश आहे.
असा तपासा तुमचा निकाल (स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस)
विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील सोप्या पद्धतींचा अवलंब करावा:
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
होमपेजवर असलेल्या 'JEE Main 2026 Session 1 Result' या लिंकवर क्लिक करा.
आता एक नवीन विंडो उघडेल, तिथे तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड प्रविष्ट करा.
माहिती भरल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
भविष्यातील उपयोगासाठी तुमचा निकाल डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट नक्की काढून ठेवा.
हेही वाचा - CBSE Board Exam 2026: सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय, दहावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियमात होणार मोठे बदल
परीक्षा सत्राचा थोडक्यात आढावा
जेईई मेन्स 2026 सत्र 1 ची परीक्षा 21, 22, 23, 24, 28 आणि 29 जानेवारी रोजी देशभरातील विविध केंद्रांवर पार पडली. यापैकी 21 ते 28 जानेवारी या कालावधीत परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. तर 29 जानेवारी रोजी केवळ एकाच शिफ्टमध्ये बी.आर्च (B.Arch) आणि बी.प्लॅनिंग (B.Planning) म्हणजेच पेपर 2 साठी परीक्षा पार पडली. आता सत्र 1 च्या निकालानंतर यशस्वी विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स्ड आणि पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहेत.