Sunday, March 08, 2026 12:48:55 PM

Jitendra Awhad: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचा घुमजाव; ; 'कुठल्याची चर्चा झाल्या नाही', म्हणतं घेतला यू-टर्न

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका बदलत यू-टर्न घेतला आहे.

jitendra awhad दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचा घुमजाव  कुठल्याची चर्चा झाल्या नाही म्हणतं घेतला यू-टर्न

Jitendra Awhad: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा गोंधळ निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी विलिनीकरणाच्या शक्यतेला दुजोरा देणारे संकेत दिल्यानंतर आता आव्हाड यांनी त्याच मुद्द्यावरून स्पष्ट यू-टर्न घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चांना उधाण आलं होतं. शरद पवार गटाकडून “अजित पवार यांना विलिनीकरणाची इच्छा होती” असा सूर लावला जात होता. मात्र, अजित पवार गटाकडून याबाबत थेट भूमिका समोर आलेली नव्हती. अशा स्थितीत जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या एका विधानामुळे या चर्चांना अधिक बळ मिळालं होतं.

काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी अजित पवार यांच्याशी झालेल्या शेवटच्या संभाषणाचा उल्लेख केला होता. “माझ्यावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित होईल,” असं अजित पवार यांनी सांगितल्याचं आव्हाड म्हणाले होते. या वक्तव्याचा अर्थ अनेकांनी दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलिनीकरणाशी जोडला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी वेग आला.

मात्र, आता आव्हाड यांनी या संपूर्ण मुद्द्यावरून अचानक भूमिका बदलली आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाम शब्दांत सांगितलं की, “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाच्या कोणत्याही चर्चेत मी सहभागी नव्हतो. अशा कुठल्याही बैठकीला मी हजर नव्हतो आणि मला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.” त्यांनी हे वक्तव्य स्पष्टपणे दाखवण्याची मागणीही माध्यमांकडे केली.

आव्हाड यांनी पुढे सांगितलं की, त्यांच्या नावाचा वापर करून विलिनीकरणाबाबत वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत, मात्र वस्तुस्थिती तशी नाही. “मी जे काही बोललो होतो, ते वैयक्तिक संभाषणाच्या संदर्भात होतं. त्याचा थेट विलिनीकरणाशी संबंध जोडणं योग्य नाही,” असा खुलासाही त्यांनी केला.

या यू-टर्नमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील अंतर्गत भूमिका नेमकी काय आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चांना खतपाणी घालणारी विधानं होत असताना, दुसरीकडे वरिष्ठ नेतेच अशा चर्चांपासून अंतर ठेवताना दिसत आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात अनेक शक्यता मांडल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्र येण्याबाबत ठोस आणि अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेतील बदलामुळे या चर्चांवर तात्पुरता विराम लागेल की आणखी संभ्रम वाढेल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या