करमाळा (सोलापूर): सध्या राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात अर्ज छाननीदरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
निवडणूक अर्ज बाद झाल्याच्या निर्णयावर आक्षेप घेत शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना जाब विचारला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये खडाजंगी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून न घेता निर्णय अधिकारी तिथून निघून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वाहनासमोर उभे राहून जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. “आम्हाला आमचा न्याय पाहिजे, आमचे म्हणणे तरी ऐकून घ्या” अशा मागणी करत कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
हेही वाचा: Driving License Banned : काय राव...सलग पाच वेळा हे नियम मोडल्यावर RTO तुमचा सत्कार करेल का?; आता होणार थेट लायसन्सच जप्त
घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये समोर उभे असलेले अधिकारी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, महेश चिवटे यांनी अर्ज प्रक्रियेतील हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना जय महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी सांगितले की, महेश चिवटे यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांनी काही मुद्द्यांवर आक्षेप उपस्थित केले होते. त्या प्रश्नांवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार स्पष्टीकरण दिले. मात्र, दिलेल्या उत्तरांवर समाधान न झाल्याने वादाला तोंड फुटले.
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, अर्ज छाननीचा निर्णय पूर्णपणे नियम व कायद्याच्या चौकटीत घेण्यात आला असून, कोणताही पक्षपात किंवा वेगळा निर्णय घेतलेला नाही. “निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच कारवाई करण्यात आली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
तरीही समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रश्नांची उत्तरे न देता घटनास्थळावरून निघून गेल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे करमाळा तालुक्यातील निवडणूक वातावरण तापले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: रोखठोक आणि थेट...भल्याभल्यांना केवळ शब्दांनी घाम फोडणारी सिंहगर्जना!; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची खणखणीत गाजलेली भाषणं