पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पंढरपूरमध्ये आज पहाटे भक्तिभावाने आणि उत्साहाने श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी सुरू झालेल्या या महापूजेचा मान यावर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांना लाभला. त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी विधीवत पूजा केली. या वर्षी मानाचा वारकरी होण्याचा सन्मान नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील रामराव बसाजी वालेगावकर आणि सुशिलाबाई वालेगावकर या दाम्पत्याला मिळाला. गेल्या 20 वर्षांपासून अखंड वारी करणाऱ्या या भक्त दाम्पत्याला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान मिळाल्याने ते भावनाविवश झाले. पांडुरंगाच्या कृपेने आम्हाला हा मान मिळाला, असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानले.
पूजेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेस कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आणि अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. त्यांनी सांगितले, “राज्यातील शेतकरी सुखी राहावेत, दुष्काळाचं संकट दूर व्हावं आणि महाराष्ट्र देशात सर्वाधिक प्रगत व्हावा,” अशी प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली. त्यांनी हेही नमूद केलं की, “पंढरपूरात महापूजेचा मान चौथ्यांदा मिळणं ही माझ्यासाठी विठ्ठलाची कृपा आहे. इथले वारकरीच खरे व्हीआयपी आहेत, आम्ही नव्हे. मी स्वतः एका साध्या वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलो आहे.” या दरम्यान त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश उपस्थित होते.
हेही वाचा: Women World Cup Final: नवी मुंबईत आज वर्ल्डकप फायनल; पावसाचे विघ्न ठरवणार का सामन्याचं भविष्य?
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी सांगितले, “चंद्रभागा नदी स्वच्छ करण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. वारकऱ्यांची ही जुनी मागणी आहे आणि ती आम्ही पूर्ण करू.” महापूजनंतर शिंदे यांनी काही तातडीचे निर्णय जाहीर करत सांगितलं की, “पंढरपूरच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी 5 कोटी रुपयांची निधी तात्काळ मंजूर केली आहे. तसेच मंदिर समितीच्या पर्यटक निवास जागेचा करार 30 वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.”
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनीदेखील भावना व्यक्त करत सांगितलं, “महापूजा करण्याचं भाग्य लाभलं, हे माझं सौभाग्य आहे. पुढील वर्षी आषाढी वारीची शासकीय महापूजा करायला आम्हाला नक्की आवडेल.” कार्तिकी वारीच्या निमित्ताने यंदा सुमारे सात लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच चंद्रभागा नदीकाठी स्नानासाठी भक्तांची गर्दी उसळली होती. पंढरपूरचा आसमंत “ज्ञानोबा माऊली, तुकाराम”च्या जयघोषाने दुमदुमला आणि भक्ती, प्रेम आणि श्रद्धेचा महासागर आज पुन्हा एकदा पांडुरंगाच्या नगरीत ओसंडून वाहताना दिसला.
हेही वाचा: Apple Watch: अॅपल वॉचमुळे समजणार उच्च रक्तदाबाची लक्षणे, आता एआय चालवणार तुमची हेल्थ अलर्ट सिस्टम