Wednesday, May 14, 2025 11:03:56 PM

धनंजय मुंडेंचे 11 मोबाईल नंबर; करुणा शर्मांनी केला गौप्यस्फोट

धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आवादा कंपनीची बैठक झाली होती. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.

धनंजय मुंडेंचे 11 मोबाईल नंबर करुणा शर्मांनी केला गौप्यस्फोट

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून करुणा शर्मा विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. यापूर्वी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले आहेत. त्यानंतर, नुकतीच धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आवादा कंपनीची बैठक झाली होती. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे. पुढे करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले की, 'माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे एक-दोन नव्हे तर तब्बल 11 मोबाईल नंबर आहेत. याच नंबरवरून त्यांचे काळे कारनामे होतात. जर या मोबाईल नंबरचा सीडीआर तपासला तर त्यांच्या निवासस्थानी झालेल्या आवादा कंपनीच्या बैठकीचा सर्व कच्चा-चिठ्ठा बाहेर येईल.' असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे बीड जिल्ह्यात खळबळ माजली असताना करुणा शर्मा यांनी उपरोक्त दावा केला आहे. त्या म्हणाल्या, 'मी केव्हाही माझ्या नवऱ्याची किंवा स्वतःच्या मुलांची पाठराखण करणार नाही. धनंजय मुंडे हे दोषी आहेत, असे मी केव्हाही म्हणाले नाही. पण कदाचित ते दोषी ठरू शकतात. कारण, त्यांच्या बंगल्यावर आवादा कंपनीकडून खंडणी मागण्याची बैठक झाली होती. याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे', अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली.

मुंडेंच्या बंगल्यावरच 'आवादा' ची बैठक झाल्याचा दावा
पुढे करुणा शर्मा यांनी असा दावा केला की, 'धनंजय मुंडे यांच्याकडे एकूण 11 मोबाईल क्रमांक आहेत. हे सर्व मोबाईल क्रमांक माझ्याकडे आहेत. या मोबाईल क्रमांकांचा सीडीआर काढा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते 11 नंबर हवे असतील तर ते मी त्यांना देईन. पण त्यांनी अद्याप मला भेटण्याची वेळ दिली नाही. मी त्यांच्याकडे कितीदा वेळ मागणार? ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मला भेटण्यासाठी वेळ द्यायला हवा. मी 2022 मध्ये मुंडे यांच्या मोबाईल क्रमांकाची तक्रार दिली होती. या क्रमांकाचा सीडीआर काढण्याची मागणीही केली होती', अशी माहिती देखील त्यांनी दिली.


सम्बन्धित सामग्री