Beed Police Bharti Tragedy: बीडमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. जिल्हा पोलीस दलाच्या 174 जागांसाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मैदानी चाचणीत धावताना परळी येथील दीपक भास्कर वाव्हळ (26) या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस दलासह राज्यभरातील भरती प्रक्रियेतील उमेदवारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मैदानावर नेमकं काय घडलं?
बुधवारी पहाटे 5 वाजल्यापासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेची धामधूम सुरू होती. दीपकने दुपारी 12:30 च्या सुमारास अत्यंत जिद्दीने आपली 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली. मात्र, धाव पूर्ण होताच त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले, परंतु उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. वाढत्या तापमानामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
प्रशासकीय नियोजनावर संतापाची लाट
या घटनेनंतर भरती प्रक्रियेच्या वेळेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कडक उन्हाचा तडाखा असताना दुपारी 12 वाजेपर्यंत चाचण्या का घेतल्या जातात, असा सवाल उपस्थित होत आहे. ग्रामीण भागातून येणारे उमेदवार अनेकदा तणावाखाली आणि उपाशीपोटी धावतात, अशा स्थितीत उन्हाचा फटका त्यांच्या जीवावर बेतू शकतो. दुर्दैवी घटना टाळण्यासाठी मैदानी चाचण्या सकाळी 9 वाजेच्या आतच संपवायला हव्या होत्या, अशी तीव्र प्रतिक्रिया आता उमटत आहे.
हेही वाचा - Bharat Bandh: कामगार हक्कांसाठी निर्णायक लढा; केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात 12 फेब्रुवारीला देशभरात संप
खाकीचं स्वप्न राहिले अधुरं
दीपक गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दलात भरती होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत होता. आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी आणि देशसेवेसाठी त्याने हे ध्येय समोर ठेवले होते. मैदानावर तो आत्मविश्वासाने उतरला होता, मात्र धाव संपल्यानंतर त्याच्या आयुष्याची शर्यतच संपली. दीपकच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एक जिद्दी तरुण पोलीस दलाला मुकला आहे.