Monday, March 09, 2026 08:03:54 AM

Pune Mumbai Expressway Accident: खंडाळा घाटात पुन्हा गॅस टँकरचं नियंत्रण सुटलं, अनर्थ टळला पण...; सध्या परिस्थिती काय?

अमृत अंजन पुलाजवळील धोकादायक वळणावर प्रोपलीन या अत्यंत ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला.

pune mumbai expressway accident खंडाळा घाटात पुन्हा गॅस टँकरचं नियंत्रण सुटलं अनर्थ टळला पण सध्या परिस्थिती काय

Pune Mumbai Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा घाटात आज सकाळी पुन्हा एकदा थरार पाहायला मिळाला. अमृत अंजन पुलाजवळील धोकादायक वळणावर प्रोपलीन या अत्यंत ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला. सुदैवाने, टँकर महामार्गालगतच्या गटारात अडकल्याने मोठा स्फोट किंवा गॅस गळतीसारखा अनर्थ टळला आणि यंत्रणेसह प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

नेमकी घटना काय?
सोमवारी सकाळी 10:15 च्या सुमारास कोचीहून गुजरातकडे जाणारा गॅस टँकर (NL-01/AF-5040) खंडाळा घाटातून जात होता. अमृत अंजन पुलाजवळील तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेला हा टँकर सिमेंटचे दुभाजक तोडून थेट डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गटारात जाऊन रुतला. हा टँकर रस्त्यावर उलटला असता, तर 20 दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताची पुनरावृत्ती झाली असती.

यंत्रणेची वेगवान हालचाल
अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस आणि खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याहून मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. रसायनतज्ज्ञ धनंजय गीध यांनी घटनास्थळी पोहोचून टँकरची पाहणी केली. अवघ्या अर्ध्या तासात क्रेनच्या सहाय्याने हा अपघातग्रस्त टँकर सुरक्षितपणे बाहेर काढून बाजूला करण्यात आला. त्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

हेही वाचा - Shashikant Shinde On Ladaki Bahin Yojna : "दादांना श्रद्धांजली म्हणून आता या योजनेला..." चालू अधिवेशनात शशिकांत शिंदेंनी केली मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?

'त्या' 38 तासांच्या आठवणी ताज्या
या अपघातामुळे प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले होते. 3 फेब्रुवारी रोजी याच मार्गावर झालेल्या अशाच एका टँकर अपघातामुळे तब्बल 38 तास अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. तो अपघात इतका भीषण होता की त्याचे पडसाद अजूनही ताजे आहेत. आजचा टँकर रस्त्यावर न उलटता गटारात अडकल्याने एका मोठ्या संकटातून महामार्ग बचावला आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या