Wednesday, January 14, 2026 12:11:05 PM

Crime News: मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने घरी बोलवलं अन्... भंडाऱ्यातील धक्कादायक घटना

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना लाखांदूर शहरात समोर आली आहे

crime news मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने घरी बोलवलं अन् भंडाऱ्यातील धक्कादायक घटना

लाखांदूर (भंडारा): महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना लाखांदूर शहरात समोर आली आहे. केवळ 5 वर्षांच्या चिमुकलीवर एका 15 वर्षीय मुलाकडून घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप उघड झाला आहे. मोबाईल दाखवण्याचा बहाणा करून घरात नेऊन झालेल्या या अत्याचारामुळे परिसरात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या घराजवळील परिसरात इतर मुलांसोबत खेळत होती. त्याच दरम्यान संबंधित अल्पवयीन आरोपीने तिला "मोबाईल दाखवतो" असे सांगत आपल्या घरी बोलावले. त्या निष्पाप विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने अमानुष कृत्य केल्याचे समोर आले आहे. घटना घडल्यानंतर घाबरलेल्या मुलीने काही काळ काहीही न सांगता शांतता राखली. मात्र, अस्वस्थ झाल्याने अखेर तिने सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला.

ही धक्कादायक माहिती कळताच मुलीच्या पालकांनी तत्काळ लाखांदूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तपासादरम्यान अत्याचाराची पुष्टी झाल्यानंतर आरोपी अल्पवयीन असल्याने, त्याच्यावर पॉक्सो कायदा (POCSO Act) व भारतीय दंड संहितेतील गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Palghar Crime: रक्षकचं बनला भक्षक! तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी आलेल्या महिलेवर पोलीस हवालदाराकडून लैंगिक अत्याचार

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. समाजात मुलांच्या सुरक्षिततेबाबत निर्माण होणारे प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात पुढे आले आहेत. अल्पवयीन मुलांसकडून होणाऱ्या गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘मोबाईल’ सारख्या साध्या कारणाचा वापर करून गुन्हेगार लहान मुलांना फसवत असल्याने, बालसुरक्षेबाबत जागरूकता अधिक वाढवण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. नागरिकांकडून आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे. विशेषत: मुलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अधिक दक्षता घ्यावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

सध्या पीडित मुलगी पालकांसोबत सुरक्षित असून तिच्या मनोबलाला धक्का बसू नये म्हणून संबंधित यंत्रणांकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. अल्पवयीन आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी बाल सुधारगृहात पाठवण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


सम्बन्धित सामग्री