Tuesday, May 20, 2025 02:41:15 PM

शेतजमिनीच्या वादातून झोपडी पाडली; राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांचे मेहुणे अडचणीत

मिरज तालुक्यातील बेडग येथे जमिनीच्या वादातून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे बाळासाहेब ओमासे यांच्यासह ५ जणांविरोधात झोपडी पाडणे व मारहाणीचा गुन्हा दाखल.

शेतजमिनीच्या वादातून झोपडी पाडली राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांचे मेहुणे अडचणीत

मिरज: मिरज तालुक्यातील बेडग येथे जमिनीच्या वादातून झोपडी पाडण्याची आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह पाच जणांविरोधात मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बेडग येथील 64 गुंठे शेतजमिनीवर सुरेश आणि राहुल उमासे हे आपल्या कुटुंबासह राहतात. ही जमीन सध्या मिरज न्यायालयात वादग्रस्त आहे. मात्र, 22 एप्रिल 2025 रोजी बाळासो ओमासे आणि इतर चार जणांनी जबरदस्तीने जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत, उमासे कुटुंबाची झोपडी पाडली आणि मारहाण केली, असा आरोप राहुल ओमासे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत केला आहे. यानंतर पोलिसांनी जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे, रघू नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे आणि स्वप्निल साबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राहुल ओमासे यांच्या तक्रारीनुसार, या आरोपींनी त्यांच्या झोपडीत घुसून त्यांना घराबाहेर काढले, झोपडीची तोडफोड केली आणि त्यांच्या वडिलांना मारहाण केली. तसेच राहुल आणि त्यांच्या आईला शिवीगाळ करण्यात आली. ही संपूर्ण घटना कुटुंबासाठी अतिशय त्रासदायक ठरली आहे.

हेही वाचा:मेंढपाळाच्या मुलाचे 'UPSC'चे स्वप्न पूर्ण; बिरदेव डोणेचं संघर्षमय यश

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बाळासो ओमासे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, सदर शेतजमिनीचा वाद न्यायालयात सुरु होता आणि 25 मार्च 2025 रोजी निकाल माझ्या बाजूने लागला आहे. ही जमीन माझ्या पत्नीच्या नावावर असून, ती तिला आजीने बक्षीसपत्राने दिली आहे. त्या जागेवर पूर्वीपासून मीच राहत होतो. झोपडी मी स्वतःच हटवली, कारण ती जागा स्वच्छ करायची होती. मारहाणीचा कोणताही प्रकार घडलेला नाही. राहुल ओमासे न्यायालयाच्या निकालाने नाराज झाल्याने माझ्यावर खोटा आरोप करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सुरु असून मिरज ग्रामीण पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र या घटनेमुळे स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणाचे पुढील तपशील येत्या काही दिवसांत समोर येण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री