लातूर : बीड जिल्ह्यातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले अखेर गुजरात पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लातूरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरात पोलिसांनी धडक कारवाई करून त्याला अटक केली. अटक झाल्यानंतर कासलेने 'मै झुकेगा नही' पुष्पा स्टाईल हातवारे करत पोलिसांना प्रतिसाद देत नाट्यमय हावभाव केले.
गुजरातमधील सुरत परिसरात अलीकडे झालेल्या घरफोडी प्रकरणात काही आरोपींना पोलिसांनी पकडल्यानंतर चौकशीत रणजीत कासले याचे नाव पुढे आले. या आरोपींना मदत केल्याचा संशय आल्याने गुजरात पोलिसांनी मागील दोन दिवसांपासून लातूरमध्ये गुप्त मोहिम राबवली. अखेर शुक्रवारी मध्यरात्री त्याला पकडण्यात यश आले.
हेही वाचा: Maharashtra Farmers Good News: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! केंद्राकडून मदतीचा दुसरा हप्ता जाहीर; महाराष्ट्राला मिळणार 1,566.40 कोटी
लातूर पोलिसांच्या सहकार्याने गुजरात पोलिसांचे सहा सदस्यीय पथक कासलेला ताब्यात घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पाल पोलीस स्टेशन, सुरत येथे रवाना झाले. कासलेवर यापूर्वी महाराष्ट्रात सात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, तर गुजरात पोलिसांनी दाखल केलेला हा आठवा गुन्हा ठरला आहे.
कासले पूर्वी बीडच्या सायबर विभागात उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता. त्याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता परराज्यात जाण्याचा आणि तपासादरम्यान आरोपींकडून पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर विभागीय चौकशीनंतर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
बडतर्फीनंतर रणजीत कासलेने सोशल मीडियावर धडाकेबाज एन्ट्री करत धुमाकूळ घातला होता. त्याने अनेक राजकीय नेते, पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांवर गंभीर आरोप करत व्हिडिओ पोस्ट केले. संतोष देशमुख हत्या प्रकरण, धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित दावे आणि वाल्मिक कराडविषयी केलेले खुलासे यामुळे तो चर्चेत आला होता. काही दिवसांपूर्वी त्याने स्वतःला एका बड्या नेत्याची ‘एनकाउंटरची ऑफर’ मिळाल्याचा दावा केल्यानेही तो पुन्हा चर्चेत आला होता.
आता गुजरात पोलिसांच्या या नाट्यमय अटकेनंतर रणजीत कासलेचा अध्याय पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पुढील चौकशीसाठी त्याला गुजरातला रवाना करण्यात आले आहे.
हेही वाचा : Saptashrungi Devi: सप्तशृंगी देवीचे मंदिर दर्शनासाठी तब्बल 19 तास खुले असणार, दिवाळीसाठी मंदिर प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय