लातूर: लातूर महापालिका प्रशासनाने मोठ्या गाजावाजाने मान्सूनपूर्व तयारी केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात ही तयारी कागदोपत्रीच राहिल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहर व परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. घरात पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबांना रात्रभर जागून रात्र काढावी लागली आहे.
महापालिकेने लाखो रुपयांचा खर्च करत नाल्यांची सफाई, गटारे स्वच्छ करणे, पाण्याचा योग्य निचरा होईल यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नव्हती, हे यावेळी स्पष्ट झाले. 'जय महाराष्ट्र'च्या ग्राउंड रिपोर्टमधून महापालिकेचे पितळ उघडे पडले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील हनुमान चौक, बुड्डा नगर, शिवाजी चौक, विवेकानंद नगर, उदगीर रोड आणि गोलाई परिसरामध्ये रस्ते जलमय झाले. काही घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरले, ज्यामुळे घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. वृद्ध, लहान मुले आणि महिलांना विशेष अडचणींचा सामना करावा लागला.
'वैष्णवी एका व्यक्तीसोबत सातत्याने चॅट करायची ' कोर्टात वैष्णवीच्या चारित्र्यावर आरोप... जाणून घ्या कोर्टात नेमकं काय घडलं
नागरिक सांगतात की, प्रत्येक वर्षी महापालिका केवळ तयारीचे ढोल बडवते. पण प्रत्यक्षात नालेसफाई किंवा गटार व्यवस्थापनावर कुठलीही योग्य कृती होत नाही. यावर्षीही नेमके तेच घडले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला रात्री घर सोडून बाहेर थांबावे लागले, असं रहिवासी नाराजीने सांगत होते.
महापालिकेचे अधिकारी मात्र पुन्हा नेहमीच्या थाटात तपासणी सुरू असल्याचे आणि पुढील उपाययोजना करण्यात येतील, असे सांगत आहेत. पण नागरिकांचा विश्वास या वेळेस पार ढासळलेला दिसत आहे. त्यांना हवी आहे ती जबाबदारी आणि योग्य कृती.
सध्या हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जर प्रशासनाने अद्यापही योग्य पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.