Saturday, June 14, 2025 04:17:03 AM

'जरांगे पागल माणूस, वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये...'; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांच्यावर घणाघात

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना त्यांना संविधानविरोधी ठरवत ओबीसी लाँग मार्चची घोषणा केली; यामुळे मराठा-ओबीसी तणाव वाढला आहे.

 जरांगे पागल माणूस वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांच्यावर घणाघात

परभणी: मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले असताना, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, 'ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करतील, त्या दिवशी आम्ही ओबीसीचा लाँग मार्च नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबा मंदिरातून मुंबईच्या दिशेने सुरू करू.'

हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर व्यक्तिगत आणि राजकीय पातळीवर अनेक गंभीर आरोप केले. 'मनोज जरांगे हे संविधानविरोधी मागण्या करतात. त्यांना लोकशाही आणि मंत्रिमंडळातील निर्णय कसे घेतले जातात याचे ज्ञान नाही. त्यामुळे ते सातत्याने मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका करतात. हा संपूर्ण महाराष्ट्रातील 12-13 कोटी जनतेचा अपमान आहे,'असे हाके यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा: आरोग्य विभागाचे अपयश; रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने महिलेची रस्त्यावरच करावी लागली प्रसूती

हाके यांनी पुढे म्हणाले की, 'जर ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल, तर मनोज जरांगे यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणणे आवश्यक आहे. ते पागल माणूस असून त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल.' हाके यांनी यावेळी राजकीय भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांचेही समर्थन केले. 'कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नाही, त्याचप्रमाणे फडणवीस राजकारणातून संपणार नाहीत,' असे ते म्हणाले.

ही टीका त्यांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे आयोजित एका सभेत केली. या भाषणामुळे राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात निर्माण झालेला तणाव अधिकच वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.

ओबीसी समाजातील अनेक नेते आता एकत्र येऊन लाँग मार्चसाठी तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.


सम्बन्धित सामग्री