Buldhana : म्हणतात ना, "नियतीचे खेळ अनाकलनीय असतात." एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही फिकं पाडेल अशी एक सत्य घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. घरातील किरकोळ वादामुळे वयाच्या 15 व्या वर्षी घर सोडून गेलेला व्यक्ती तब्बल 55 वर्षांनंतर आपल्या भावाला पुन्हा भेटला. या भेटीने केवळ दोन्ही भावांचेच नव्हे, तर उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले.
रागाच्या भरात सोडलं घर
मूळचा केरळमधील त्रिचूर जिल्ह्यातील असलेला हा व्यक्ती 55 वर्षांपूर्वी रागाच्या भरात घर सोडून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने केरळमध्येच मिळेल ते काम करून उदरनिर्वाह केला. विशेष म्हणजे, आयुष्यभर स्वतःच्या कष्टाची कमाई त्याने स्वतःसाठी न वापरता अनाथाश्रमांना दान केली. मात्र, उतारवयात एकटेपणाची जाणीव टोचू लागली आणि आपल्या माणसांच्या ओढीने त्यांनी मुंबईची वाट धरली.
रेल्वेतून उडी आणि मृत्यूच्या दारातून परतीचा प्रवास
नांदुरा रेल्वे स्टेशनच्या पुढे धावत्या गाडीतून त्यांनी अचानक उडी मारली, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. रेल्वे पोलिसांनी त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल केले. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ते शुद्धीवर आले. रुग्णालयातील कर्मचारी रमेश अवचार यांनी माणुसकी दाखवत त्यांची आस्थेने चौकशी केली आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
हेही वाचा - Girl Rescued Childrens : लहानग्या मुलीच्या शौर्याला सलाम! प्रसांगावधान दाखवत लिफ्टमध्ये अडकलेल्या दोन मुलांना वाचवलं अन्, Video Viral
55 वर्षांनंतर झाला 'चमत्कार'
अवचार यांच्या प्रयत्नांमुळे अखेर केरळमधील त्यांच्या भावाचा संपर्क क्रमांक मिळाला. आपला भाऊ जिवंत आहे आणि तो महाराष्ट्रात आहे, हे ऐकून कुटुंबीयांना आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. नातेवाईक तातडीने रुग्णालयात पोहोचले. 55 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर जेव्हा दोन भाऊ समोरासमोर आले, तेव्हा शब्दांऐवजी केवळ अश्रूंनीच संवाद साधला. दरम्यान, वयाच्या 15 व्या वर्षी हरवलेला मुलगा आता 70 वर्षांचा वृद्धाच्या रूपात परतला होता. ही केवळ दोन भावांची भेट नव्हती, तर हरवलेल्या आशेचा आणि माणुसकीचा विजय होता. रेल्वे पोलीस आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका कुटुंबाची पाच दशकांची प्रतीक्षा संपली आहे.