Tuesday, March 17, 2026 02:32:38 PM

Kolhapur Zilla Parishad Election 2026 : जिल्ह्यात स्थानिक पक्षांचं तगडं आव्हान, महायुतीतील अंतर्गत कलह ठरू शकेल का घातक?: तालुकानिहाय समीकरण बदलली

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षचं एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

kolhapur zilla parishad election 2026   जिल्ह्यात स्थानिक पक्षांचं तगडं आव्हान महायुतीतील अंतर्गत कलह ठरू शकेल का घातक तालुकानिहाय समीकरण बदलली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षचं एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फारच कमी ठिकाणी दुरंगी लढती असून अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. महाविकास आघाडीकडे आपल्याकडील उमेदवार जाऊ नयेत, यासाठी स्वतंत्र लढणाऱ्या महायुतीचा हा डाव यशस्वी होणार की कसे हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तालुकानिहाय लढती पाहायचा झाल्या तर करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी वडणगे, उचगाव, पाडळी खुर्द, शिये, पाचगाव, सडोली खालसा, शिंगणापूर या सात मतदारसंघांत तिरंगी लढत होत आहे. कळंबे तर्फ ठाणे, मुडशिंगी, निगवे खालसा, गोकुळ शिरगावमध्ये दुरंगी सामना होत असून, सांगरूळमध्ये मात्र चौरंगी लढत होत आहे. विविध मतदारसंघांत काँग्रेसबरोबरच, राष्ट्रवादी, भाजप, शिंदेसेनेचेही उमेदवार एकमेकांच्या विरोधात असल्याचे दिसून येते. हातकणंगले तालुक्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे चित्र असले तरी कुंभोज गटात जनसुराज्यनेही आपला उमेदवार दिला आहे.

हेही वाचा : Kolhapur Zilla Parishad Election 2026 : कोल्हापुरातील 23 लाख 40 हजार मतदार; परिषदेसाठीच्या 241, तर पंचायत समितीसाठीच्या 455 उमेदवारांना करणार मतदान

कागल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या युतीविरोधात शिंदेसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि माकप एकत्रित येऊन लढा देणार आहेत. या ठिकाणी महायुतीमध्ये शिंदेसेनेचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांना वगळून हसन मुश्रीफ, संजय घाटगे आणि समरजित घाटगे एकत्र आले आहेत. गडहिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात चुरशीचा सामना होत आहे. जिल्हा परिषदेसाठी नूलमध्ये चौरंगी, नेसरीत चौरंगी, गिजवणेत तिरंगी, भडगावमध्ये दुरंगी तर हलकर्णीत पंचरंगी सामना होत आहे. शिरोळ तालुक्यात महाविकास आघाडीविरुद्ध राजर्षी शाहू विकास आघाडी अशी लढत होत असली तरी भाजप चार जिल्हा परिषद व सात पंचायत समिती जागा लढवित आहे. 

भुदरगड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर माघार करवून घेण्यात नेत्यांना यश आले आहे तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी 136 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 113 जणांनी माघार घेतली असून 23 उमेदवार अंतिम लढतीत आहेत. राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सरवडे मतदारसंघात तिरंगी, राधानगरी व राशिवडे मतदारसंघात चौरंगी, कसबा वाळवेमध्ये पंचरंगी तर कसबा तारळेमध्ये बहुरंगी लढत होत आहे. तालुक्यात निवडणुकीच्या अगोदरपासून भाजप व शिंदेसेनेच्या युतीची जोरदार चर्चा सुरू होती मात्र ती फिस्कटली.

चंदगड तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ दुरंगी लढत होत असून, अनेक मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अडकूर गटात मात्र काँग्रेसने तिन्ही अर्ज ठेवत महायुतीला आव्हान देत निवडणुकीत रंगत आणली आहे. उद्धवसेना केवळ अडकूर गणातून निवडणूक मैदानात असून, शिंदेसेनेने ऐनवेळी उमेदवार दिलेला नाही. गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी पाच तर पंचायत समितीच्या चार जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. येथे काँग्रेस विरोधात शिंदेसेना व भाजप महायुतीमध्ये सरळ सामना होत आहे. शाहूवाडी तालुक्यात जनसुराज्यविरोधात उद्धवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. तर भाजपनेही विरोधात उमेदवार उभे केले आहेत. आजरा तालुक्यातील दोन गटांत महायुतीमध्येच संघर्ष असल्याचे चित्र आहे. उत्तूर गटामध्ये राष्ट्रवादी, ताराराणी आघाडी आणि शिंदेसेना असा तिरंगी सामना आहे, तर पेरणोली गटामध्ये राष्ट्रवादी, शिंदेसेना आणि भाजप असा प्रामुख्याने तिरंगी सामना आहे. पन्हाळा तालुक्यातही जनसुराज्यविरोधात काही ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी, शिंदेसेना लढत आहे. तर कोडोलीमध्ये दोन्ही उमेदवार अपक्ष असून त्यांना विविध पक्षांनी पाठिंबा दिल्याचे चित्र पाहालया मिळत आहे.


सम्बन्धित सामग्री