Wednesday, April 22, 2026 10:26:01 PM

Yogesh Kadam: ड्रग्जचा मुद्दा सभागृहात तापला; शशिकांत शिंदे, अनिल परबांचा योगेश कदम यांच्यावर प्रश्नांचा भडीमार

महाराष्ट्र विधानसभेत वाढत्या ड्रग्ज तस्करीच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाला आहे.

yogesh kadam ड्रग्जचा मुद्दा सभागृहात तापला शशिकांत शिंदे अनिल परबांचा योगेश कदम यांच्यावर प्रश्नांचा भडीमार

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज तस्करी आणि निर्मितीच्या मुद्द्यावरून विधानसभेत आज जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधकांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार करत कठोर कारवाईची मागणी केली, तर सरकारनेही अनेक ठिकाणी कठोर पावले उचलल्याचा दावा केला. सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे (उबाठा गट) आमदार अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत सरकारला जाब विचारला.

शशिकांत शिंदे यांचा सवाल

शशिकांत शिंदे यांनी ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख करत सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, या प्रकरणात मकोका (MCOCA) लावण्याची कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात कारवाई झाल्याचे दिसते, मात्र कोणावरही मकोका लावण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकार नेमकी कोणती भूमिका घेत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्याचबरोबर राज्यात ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विशेषतः गोडाऊनमध्ये ड्रग्जची निर्मिती होत असल्याची माहिती असल्याचे सांगत अशा ठिकाणी व्यापक सर्च मोहीम राबवून तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

योगेश कदम यांचे स्पष्टीकरण

या आरोपांना उत्तर देताना गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, ड्रग्जविरोधात सरकारने मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून 14 ठिकाणी मकोका लावण्यात आला आहे. ड्रग्ज संदर्भातील अनेक प्रकरणांमध्ये आरोपींवर कारवाई करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. ड्रग्ज तस्करीवर तत्काळ आणि प्रभावी कारवाई करण्यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून या विभागात पदभरतीही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा: Israel-US Vs Iran War मुळे गॅस पुरवठा थांबणार, तुमचा मोबाईल बंद होणार?

“मकोका लावण्याची कारवाई झाली नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. आजपर्यंत अनेक ठिकाणी मकोका लावण्यात आला आहे. ग्रामीण भागात शेडमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज निर्मितीच्या व्यवसायांवरही आम्ही कारवाई केली आहे,” असे मंत्री कदम यांनी स्पष्ट केले. तसेच या टास्क फोर्समध्ये उर्वरित पदभरती लवकरच करण्यात येणार असून संबंधित कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह देण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अनिल परब यांची सरकारवर टीका

दरम्यान, आमदार अनिल परब यांनी सरकारवर तीव्र टीका केली. ते म्हणाले की, सरकार कारवाई करत असल्याचे सांगत असले तरी वर्षानुवर्षे सभागृहात हीच चर्चा ऐकायला मिळते, मात्र राज्यातील ड्रग्ज तस्करीचे गुन्हे कमी होताना दिसत नाहीत.

“सरकार कारवाई करत आहे असे सांगते, पण प्रत्यक्षात डमी लोकांना अटक केली जाते. ललित पाटीलसारखा आरोपी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होता. पकडलेल्या लोकांना हॉटेलमध्ये ठेवून त्यांना विशेष वागणूक दिली जाते. आत त्यांना कोणत्या सोयी-सुविधा दिल्या जातात हे आम्हाला चांगले माहीत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

ड्रग्ज तयार करणाऱ्या साखळीत सर्वात महत्त्वाची भूमिका केमिस्टची असते, त्यामुळे अशा केमिस्ट लोकांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा: BMC Transfer Letter: 'BMC' मधील बदल्यांवरून भाजपमध्येच 'सामना'? मुख्यमंत्र्यांची स्थगिती, तरीही महापौरांचे प्रशासनाला पत्र

‘एन्काऊंटर स्कॉड’सारखी कारवाईची मागणी

अनिल परब यांनी पुढे बोलताना अधिक कठोर कारवाईची मागणी केली. राज्यात गुन्हेगारी कमी करण्यासाठी जसे एन्काऊंटर स्कॉड तयार करण्यात आले होते, त्याच धर्तीवर ड्रग्जविरोधात विशेष स्कॉड तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. “ड्रग्ज निर्मितीत मदत करणाऱ्यांवर थेट कारवाई करा. अक्षय शिंदेला जसे उडवले तसे दोन-चार लोकांना उडवा,आम्ही तुम्हाला त्यामागची कारणेही लिहून देऊ,” असे वक्तव्य करत त्यांनी सरकारने कठोर पावले उचलण्याची मागणी केली.

ड्रग्ज तस्करीवर कठोर कारवाई झाली नाही तर राज्यातील पुढील पिढी उध्वस्त होईल, असा इशाराही परब यांनी दिला.

सभागृहातील या चर्चेमुळे राज्यातील वाढत्या ड्रग्ज तस्करीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली असून, सरकारकडून पुढील काळात कोणती ठोस पावले उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Dubai Airport Drone Attack: दुबई विमानतळावर मोठा ड्रोन हल्ला! एका भारतीयासह चौघेजण जखमी; यूएईमध्ये दहशतीचे वातावरण


सम्बन्धित सामग्री