मुंबई: देशाचे आणि राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्राथमिक कल हाती आले असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार मुसंडी मारली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भाजपने १०० जागांचा टप्पा पार करत 'सेंच्युरी' पूर्ण केली आहे. या जबरदस्त कामगिरीमुळे शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्या 'महाविकास आघाडी'ला मोठा धक्का बसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपची सरशी
मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप झाले, अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. मात्र, आता हाती येत असलेल्या कलांनुसार, मुंबईकरांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याचे प्राथमिकरीत्या दिसून येत आहे. शंभरहून अधिक जागांवर आघाडी घेतल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा कमळ येणार का?, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा: BMC Election Results 2026: अजित पवार गटाला मुंबईत 'मोठा धक्का'; नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक पराभूत
ठाकरे युतीसमोर कडवे आव्हान
मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला भाजपने दिलेल्या या धक्क्यामुळे राजकीय समीक्षकही चकित झाले आहेत. मुंबईतील अनेक पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये भाजपने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पिछाडीवर टाकले आहे.
चित्र अद्याप प्राथमिक
महत्त्वाची बाब म्हणजे, हे केवळ सुरुवातीचे कल आहेत. अनेक प्रभागांमध्ये अद्याप मतमोजणीच्या फेऱ्या बाकी असून, अंतिम निकाल हाती येण्यास काही तासांचा अवधी उरला आहे. थोड्याच वेळात सर्व जागांचे चित्र स्पष्ट होईल आणि मुंबईचा नवा 'महापौर' कोणत्या पक्षाचा असेल, हे निश्चित होईल. मात्र, सध्याच्या घडीला भाजपने घेतलेली आघाडी पाहता, मुंबईच्या राजकारणात मोठे सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: Kalyan Dombivli Election Results 2026: कल्याण डोंबिवलीमधून प्रल्हाद म्हात्रे यांचा विजय; ठाकरे युतीचा 'फॅक्टर' चालला