नवरात्रोत्सवाची धामधूम ओसरताच दिवाळीच्या आनंदात पावसाने अनाहूत ‘एन्ट्री’ घेतली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई आणि उपनगरांमध्ये सायंकाळी झालेल्या मुसळधार सरींनी अनेकांना अक्षरशः धास्तावून सोडले. ढगफुटीप्रमाणे पडलेल्या या पावसामुळे परतीचा हंगाम संपत नाहीच अशीच भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
यंदाची दिवाळी जुलै-ऑगस्टच्या पावसाळ्याची आठवण करून देत आहे. त्यामुळे “परतीचा पाऊस अखेर परतेल तरी कधी?” असा प्रश्न पुन्हा एकदा ऐकू येऊ लागला आहे.
हवामान विभागाने दिवाळी नंतरही येत्या चार दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे. नागपूर आणि परभणीसारखे विदर्भातील जिल्हेही या अलर्टच्या कक्षेत आले आहेत.
हेही वाचा: Satara: रात्री फलटणच्या हॉटेलमध्ये गेली अन्..., महिला डॉक्टरच्या अखेरच्या 10 तासात काय घडलं?
25 ऑक्टोबर रोजी अलर्टची व्याप्ती पालघर, जालना, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोलीपर्यंत पोहोचणार आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अरबी समुद्रातील वाऱ्यांची दिशा बदलल्याने हवामानात अस्थिरता निर्माण झाली असून पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघरकरांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळीचा उत्साह कायम ठेवत, सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची आवश्यकता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.