Maharashtra DA hike: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महागाईच्या वाढत्या ताणामुळे भत्त्यात वाढ करण्याची मागणी जोर धरत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
सरकारच्या निर्णयानुसार महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने जुलै २०२५ पासून लागू करण्यात येणार असून, संबंधित थकबाकीही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत याबाबतची अधिकृत माहिती दिली.
राज्यातील सुमारे ५ लाख १६ हजार शासकीय कर्मचारी तसेच ८ लाख ७२ हजार निवृत्त कर्मचारी या निर्णयामुळे लाभार्थी ठरणार आहेत. वाढीव भत्ता फेब्रुवारी २०२६ पासून नियमित पगारात रोखीने दिला जाईल. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकीची रक्कम स्वतंत्रपणे अदा करण्यात येणार असून, मार्च २०२६ मध्ये गुढीपाडव्याच्या सुमारास ती देण्याचा सरकारचा मानस आहे.
हेही वाचा: PM Narendra Modi Instagram: इन्स्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू; 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार
महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची तयारी सुरू केली आहे. त्याचा परिणाम राज्यातील कर्मचाऱ्यांवरही होणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारने महागाई भत्त्यात वाढ करून कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असून, बाजारपेठेलाही त्याचा सकारात्मक परिणाम जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी पुढील काळात मूलभूत वेतनवाढीबाबतही सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. वाढत्या जीवनावश्यक खर्चामुळे घरगुती बजेटवर ताण येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारने मात्र सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: Maharashtra Government: भूसंपादनाला गती देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'ही' कामे 7 दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक
दरम्यान, या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडणार असला तरी कर्मचाऱ्यांचा मनोबल उंचावण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता, असे सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच ही घोषणा झाल्याने अधिवेशनात याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
एकूणच, महागाई भत्त्यातील ३ टक्क्यांची वाढ ही राज्य कर्मचाऱ्यांसाठी धुळवडीची खास भेट ठरली आहे. वाढीव भत्ता आणि थकबाकीच्या रकमेची प्रतीक्षा आता कर्मचाऱ्यांना लागली असून, पुढील आदेशांची उत्सुकता सर्वांनाच आहे.