Wednesday, February 18, 2026 07:45:56 AM

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! राज्यात लवकरच कर्जमाफीचा निर्णय; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

farmers loan waiver शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी राज्यात लवकरच कर्जमाफीचा निर्णय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

Maharashtra: राज्यातील शेतकरी वर्गासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत ठाम भूमिका मांडत, सरकार दिलेला शब्द पाळणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे.

राज्यातील अनेक भागांत शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले असताना, कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. वर्षानुवर्षे शेतात मेहनत करूनही आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचा सरकार विशेष विचार करणार आहे.

धनदांडग्या किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेतून वगळले जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ज्यांच्याकडे आलिशान घरे, महागड्या गाड्या, फार्महाऊस किंवा मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही, असे संकेत मंत्री बावनकुळे यांनी दिले. याउलट, डोक्यावर कर्जाचा भार असलेले आणि शेतीवरच संपूर्ण उपजीविका अवलंबून असलेले शेतकरी या निर्णयाच्या केंद्रस्थानी असतील.

लातूर जिल्ह्यातील लामजना येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचा उल्लेख करत, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे सांगितले. कर्जमाफी हा केवळ राजकीय निर्णय नसून, शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी उचललेले आवश्यक पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

कर्जमाफी कधी आणि कशा स्वरूपात लागू केली जाईल, याबाबत अद्याप सविस्तर माहिती जाहीर झालेली नाही. मात्र, सरकारच्या या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडताना अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आता सरकारकडून अधिकृत निर्णय आणि मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा कधी होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कर्जमाफी प्रत्यक्षात कधी लागू होणार, यावर पुढील काळात स्पष्टता येण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री