Friday, June 12, 2026 10:54:15 PM

Maharashtra Weather: राज्यात एकीकडे उष्णतेची लाट, तर दुसरीकडे वादळी पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात कसं असणार हवामान?

राज्यात उष्णतेचा तडाखा वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे

maharashtra weather राज्यात एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे वादळी पावसाचा इशारा तुमच्या जिल्ह्यात कसं असणार हवामान

Maharashtra Weather: महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेने अक्षरशः कहर केला असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. एकीकडे मान्सूनच्या आगमनाच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांसाठी उष्णतेची लाट, वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा इशारा जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील हवामान अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुण्यात रविवारी तापमानाने चाळिशी पार केली. शिवाजीनगर येथे 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून गेल्या काही वर्षांतील मे महिन्यातील ही उच्चांकी नोंद मानली जात आहे. दिवसभर प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. रात्रीही उकाडा कायम राहिल्याने पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या आठवड्यात पुण्यात तापमान 40 ते 41 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेचा हफ्ता थांबला? 54 लाख महिलांचा लाभ बंद; तुमचं नाव यादीत आहे का लगेच तपासा

दरम्यान, कोकण किनारपट्टीवर हवामानात अचानक बदल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. मात्र पावसाचा अंदाज असला तरी तापमानात मोठी घट होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र उष्णतेचा जोर अधिक राहणार असून नाशिकसह अनेक भागांत कोरडे हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Illegal Schools In Maharashtra : मुंबई - पुण्यासह राज्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर, 76 शाळा बंद, तर 111 शाळांवर FIR दाखल; शिक्षण विभागाची धडक कारवाई

मराठवाड्यात बीड, लातूर, धाराशिव, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात उष्णतेचा कहर सुरूच असून काही जिल्ह्यांमध्ये तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचले आहे. अकोला, अमरावती आणि बुलढाणा भागात उकाड्यासोबतच हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री