Monday, March 09, 2026 02:51:46 AM

HSC Board Paper Leak: पोलिसांचा धाक संपुष्टात? गुन्हा दाखल होऊनही फुटला बारावीचा गणिताचा पेपर; 'कॉपी'बहाद्दरांचे धाडस आणि शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे

महाराष्ट्रातील बारावी परीक्षेत पेपरफुटी प्रकरण गंभीर बनले असून रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरही फुटल्याचे समोर आले आहे.

hsc board paper leak पोलिसांचा धाक संपुष्टात गुन्हा दाखल होऊनही फुटला बारावीचा गणिताचा पेपर कॉपीबहाद्दरांचे धाडस आणि शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे

मुंबई: "कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद कुणाकडे मागायची?" असाच काहीसा संतापजनक प्रकार सध्या राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत पाहायला मिळत आहे. बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा, पण याच परीक्षेला आता 'पेपरफुटीच्या' वाळवीने पोखरल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील सर्वात मोठा आणि धक्कादायक उलगडा म्हणजे, पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपींच्या निर्ढावलेल्या वृत्तीत किंचितही फरक पडला नाही. कायद्याचा कसलाही धाक न बाळगता या रॅकेटने चक्क 21 फेब्रुवारीला झालेला गणिताचा पेपरही फोडल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे राज्याच्या शिक्षण मंडळाच्या सुरक्षेवरच एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, नागपूर विभागात 18 फेब्रुवारीला पेपरफुटीचा पहिला गुन्हा दाखल झाला होता. मात्र, पोलिसांच्या तपासाची आणि कारवाईची कोणतीही पर्वा न करता आरोपींनी आपले काळे धंदे सुरूच ठेवले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी स्वतः गणिताचा पेपर फुटल्याच्या या गंभीर प्रकाराला दुजोरा दिला आहे. सध्या शिक्षण मंडळ आणि पोलीस प्रशासन युद्धपातळीवर समन्वय साधून असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या महाघोटाळ्याचे धागेदोरे नागपूरच्या सेंट उर्सुला शाळेतील एका संशयास्पद घटनेतून हाती लागले. परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीने वारंवार स्वच्छतागृहात जाण्याचा बहाणा केला. पर्यवेक्षकांना संशय आल्यावर तिची झडती घेण्यात आली आणि तिच्याजवळील मोबाईल फोनने संपूर्ण राज्याला हादरवणारे सत्य उघड केले.

हेही वाचा: Marathi Bhasha Gaurav Din: 'मराठी ही केवळ साहित्याचीच नव्हे, तर ज्ञानाची भाषा व्हावी...'; मराठी भाषा गौरव दिनी मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

या फोनच्या तांत्रिक तपासणीतून 16 फेब्रुवारीचा रसायनशास्त्राचा (Chemistry) आणि 18 फेब्रुवारीचा भौतिकशास्त्राचा (Physics) पेपर परीक्षेआधीच एका व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल झाल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, केवळ प्रश्नपत्रिकाच नाही, तर त्यासोबत संभाव्य उत्तरेही या ग्रुपवर अगदी बिनदिक्कतपणे पुरवली जात होती.

सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला वेग आला. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून, यात शिक्षक निशिकांत मून, 'एक्सेलन्ट अकादमी'चा मुस्तफा खान आणि जुनेद जावेद यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका खाजगी कोचिंग क्लासच्या माध्यमातून पैशांच्या मोबदल्यात हा काळाबाजार चालवला जात होता.

गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच काही आरोपींनी आपल्या मोबाईलचा डेटा 'फॉरमॅट' करून पुरावे नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी नेमण्यात आलेल्या पाच सदस्यीय विशेष तपास पथकाने (SIT) अत्यंत शिताफीने डिजिटल पुरावे गोळा करत गणिताचा पेपरही फुटल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. असे असले तरी, या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांच्या रडारबाहेर असल्याने तपासाचे आव्हान कायम आहे.

यंदाच्या बारावीच्या परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून त्या 11 मार्चपर्यंत चालणार आहेत. जोपर्यंत मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत आणि या 'पेपरफुटी'चा समूळ नाश होत नाही, तोपर्यंत गुणवंत विद्यार्थ्यांच्या मनात व्यवस्थेबद्दल निर्माण झालेला अविश्वास पुसून काढणे अशक्य आहे.

हेही वाचा: SIP For Gen Z: पार्टी नको, आता SIP करा; विसाव्या वर्षापासून दरमाह एक हजार गुंतवा आणि करोडपती व्हा, कसं? वाचा सविस्तर


सम्बन्धित सामग्री