मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एक नवा अध्याय सुरू झाला. सर्व मंत्र्यांना iPad वितरित करण्यात आले असून ‘ई-कॅबिनेट’ला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कागदविरहित मंत्रिमंडळ बैठकांची संकल्पना अखेर प्रत्यक्षात उतरली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यापासूनच मंत्रिमंडळ बैठकीतील गोपनीयता टिकवण्यासाठी आणि कार्यपद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी ई-कॅबिनेटसारख्या आधुनिक प्रणालीचा आग्रह धरला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जानेवारी महिन्यात ‘ई-कॅबिनेट’चा आराखडा सादर केला होता.
हेही वाचा: Iran-Israel War: ट्रम्प यांचा युद्धबंदीचा फोल दावा? इराणकडून हल्ले सुरूच, इस्रायल सज्ज
यापुढे प्रत्येक मंत्र्याच्या iPad वर थेट मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा पाठवण्यात येणार आहे. हा अजेंडा वाचण्यासाठी एक खास कोडही दिला जाईल. तो कोड टाकल्याशिवाय अजेंडा उघडता येणार नाही. यामुळे बैठकीच्या आधी अजेंडा बाहेर जाण्याची शक्यता पूर्णतः टळणार आहे.
काही महिन्यांपूर्वी बैठकांचे अजेंडे बैठक होण्यापूर्वीच प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचत असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळेच सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने 50 iPads खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. iPad, मॅजिक कीबोर्ड, पेंसिल आणि कव्हरसाठी सुमारे 1 कोटी 16 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
ई-कॅबिनेटमुळे मंत्र्यांचे कामकाज सुलभ होणार असले तरी काही मंत्री तांत्रिकदृष्ट्या अद्याप पारंगत नसल्याचेही बोलले जात आहे. अनेक मंत्री Android किंवा iOS डिव्हाइसेस सहज वापरू शकत नाहीत. त्यामुळे मंत्रीमहोदयांना त्यांचे पीए किंवा ओएसडी यांची मदत घ्यावी लागेल, असेही म्हटले जात आहे.
आधीही सरकारने काही मंत्र्यांसाठी लॅपटॉप खरेदी केले होते, मात्र त्यांचा वापर फारसा झालेला नाही. त्यामुळे यावेळी केवळ iPad देणे पुरेसे ठरणार नाही, तर त्याचा योग्य उपयोग व्हावा यासाठी मंत्र्यांना iPad वापरण्याचे प्रशिक्षण देणे हेदेखील एक महत्त्वाचे आव्हान असणार आहे.