Sunday, February 08, 2026 08:05:41 AM

Eknath Shinde: महायुतीत ऑल इज नॉट वेल? सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी, कारण काय?

महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीतील अंतर्गत तणाव उफाळून आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.

eknath shinde महायुतीत ऑल इज नॉट वेल  सलग दुसऱ्या कॅबिनेट  बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी कारण काय

मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या महापालिका निवडणुकांच्या निकालांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या समीकरणांवरून 'महायुती'त धुसफूस सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आज होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग दुसऱ्यांदा गैरहजर राहणार असल्याने राजकीय तर्कवितर्कांना चांगलेच उधाण आले आहे. मुंबईसह काही प्रमुख शहरांच्या महापौरपदावरून युतीत तणाव निर्माण झाल्याचे बोलले जात असतानाच शिंदेंनी बैठकीला दांडी मारल्याने 'नेमकं चाललंय काय?' असा प्रश्न विचारला जात आहे.

महापौरपदावरून रस्सीखेच?

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीने निर्भेळ यश मिळवले असले तरी, सत्तेच्या वाटपावरून अंतर्गत कलह सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः मुंबई महापालिकेत भाजपने 89 जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली असली तरी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 29 जागांसह किंगमेकरची भूमिका बजावली आहे. मुंबईचा महापौर आपलाच असावा, असा आग्रह शिवसेना शिंदे गटाकडून धरला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दुसरीकडे, ठाण्यासारख्या शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही भाजपने आपला दावा ठोकल्याने वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.

मंत्रिमंडळ बैठकीकडे पुन्हा पाठ

मुंबईत महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांसाठी आज मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, मागील बैठकीप्रमाणेच याही बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार नाहीत. महापालिका निकालांनंतर सत्तेचे समतोल राखण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. अशा संवेदनशील वेळी शिंदेंची अनुपस्थिती ही केवळ योगायोग नसून ती 'सायलेंट' नाराजी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

हेही वाचा: Pune Crime : आधी लेकाचा जीव घेतला, नंतर लेकीवरही प्राणघातक हल्ला... वाघोलीत जन्मदात्या आईच्या क्रूर कृत्याने संपूर्ण शहर हादरलं

जावळीतून जिल्हा परिषदेचे बिगुल

एकनाथ शिंदे सध्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी त्यांनी आतापासूनच कंबर कसली आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी येथे आयोजित जाहीर प्रचार सभेतून त्यांनी आज ग्रामीण मतदारांना साद घातली. 

ग्रामीण भागाकडे मोर्चा

महापालिकांमधील यशानंतर शिंदे यांनी आपला पूर्ण मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवला आहे. महायुतीमध्ये शहरी भागात भाजपचे वर्चस्व दिसत असताना, ग्रामीण भागात आपली पकड मजबूत करून वाटाघाटीत वरचढ राहण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असल्याचे दिसते. जावळीतील सभेत त्यांनी केलेल्या भाषणात विरोधकांवर सडकून टीका केली असली तरी, मित्रपक्षाबाबतच्या त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सत्तासंघर्ष की निवडणुकीची रणनीती?

एकीकडे मंत्रिमंडळात राज्याच्या हिताचे विषय प्रलंबित असताना, उपमुख्यमंत्र्यांनी मैदानात उतरून पक्षाची ताकद वाढवण्याला दिलेले प्राधान्य अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. ही त्यांची राजकीय नाराजी आहे की आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आखलेली विशेष रणनीती? महापालिकांमधील 'महाविजय' नंतर महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते आणि महायुतीतील हे 'तणावाचे ढग' कधी निवळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा: Sindhudurg: मंदिर नाही, मूर्ती नाही तरी हजारो भाविक श्रद्धेने येतात; मानसीश्वर जत्रेचं रहस्य काय?


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या