Tuesday, February 17, 2026 08:02:55 AM

Mayor Election: महापौर' ठरला! अखेरच्या क्षणी 'या' नेत्याने टाकली गुगली; पाहा कोणाची लागली वर्णी

महायुतीच्या समन्वयामुळे विरोधकांनी अर्ज दाखल न केल्याने ही प्रक्रिया निर्विवाद पार पडली.

mayor election महापौर ठरला अखेरच्या क्षणी या नेत्याने टाकली गुगली पाहा कोणाची लागली वर्णी

जळगाव: खान्देशातील राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या जळगाव महानगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महापौरपदाच्या शर्यतीत कोणाची वर्णी लागणार, या उत्कंठेचा शेवट झाला असून, जळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकला आहे. भाजपने महापौरपदासाठी सौ. दीपमाला काळे यांचे नाव निश्चित केले आहे, तर उपमहापौरपदाची जबाबदारी शिवसेनेच्या (शिंदे गट) मनोज चौधरी यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विरोधी बाकावरून अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने या दोन्ही निवडी 'बिनविरोध' होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या या महत्त्वपूर्ण निवडीसाठी महायुतीने अत्यंत सावध आणि समतोल भूमिका घेतल्याचे दिसून आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या निर्णायक बैठकीला राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह महायुतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. आगामी निवडणुकांचे गणित आणि युतीमधील समन्वय अबाधित राखण्यासाठी महापौरपद भाजकडे तर उपमहापौरपद शिवसेनेकडे देण्याचा धोरणात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सत्तेच्या वाटपाचा '10 महिन्यांचा फॉर्म्युला'. महायुतीमधील जास्तीत जास्त नगरसेवकांना पदाचा बहुमान आणि काम करण्याची संधी मिळावी, यासाठी हा विशेष प्रयोग राबवला जाण्याचे संकेत आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले की, 10 महिन्यांच्या कालावधीनंतर फेरबदल करून इतर इच्छुकांनाही संधी दिली जाऊ शकते. अर्थात, या फॉर्म्युलाची अंमलबजावणी आणि भविष्यातील खांदेपालटाचे सर्व सर्वाधिकार मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.

हेही वाचा: Sunetra Pawar: 'दादां'चा वारसा, 'दादां'चीच दालने; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांबाबत सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

विरोधी पक्षांच्या गोटात असलेली शांतता आणि महायुतीचे संख्याबळ पाहता, विरोधकांनी या निवडणुकीतून माघार घेणेच पसंत केले. महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी केवळ एकच अर्ज आल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली आहे. या घडामोडीमुळे जळगाव महापालिकेवर भाजप-शिवसेना महायुतीचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. दीपमाला काळे यांच्या रूपाने शहराला एक अभ्यासू आणि संयमी महिला नेतृत्व लाभले आहे, तर मनोज चौधरी यांच्या निवडीमुळे शिवसेनेची ताकद शहरात अधिक भक्कम होणार आहे.

आता केवळ कायदेशीर सोपस्कारांची पूर्तता बाकी आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पीठासीन अधिकारी अधिकृतपणे या दोन्ही नावांची घोषणा करतील. या घोषणेनंतर जळगाव शहराच्या विकासाची धुरा अधिकृतरीत्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या हाती येईल. महायुतीच्या या एकजुटीमुळे जळगावच्या राजकीय सारीपाटावर कमळ आणि धनुष्यबाण एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Ladaki Bahin Yojna : 'लाडकी बहीण योजना' अजित पवार यांच्या नावाने ओळखली जावी; राष्ट्रवादीतील नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे भावूक मागणी


सम्बन्धित सामग्री