Thursday, February 12, 2026 05:57:27 PM

Mayor Election 2026: महापौरपदाची समीकरणं बदलली! भाजप रेसमधून आऊट, राजकीय हालचालींना वेग

यंदा महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने तब्बल 50 नगरसेवक असलेला भाजप तांत्रिकदृष्ट्या या शर्यतीबाहेर फेकला गेला आहे.

mayor election 2026 महापौरपदाची समीकरणं बदलली भाजप रेसमधून आऊट राजकीय हालचालींना वेग

कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्ताकारणात अचानक नवे वळण आले असून, महापौरपदाच्या आरक्षण सोडतीने संपूर्ण राजकीय गणितच उलथवून टाकले आहे. यंदा महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने तब्बल 50 नगरसेवक असलेला भाजप तांत्रिकदृष्ट्या या शर्यतीबाहेर फेकला गेला आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे शिवसेना (शिंदे गट) पुन्हा एकदा सत्तेच्या केंद्रस्थानी आली असून, महापौरपदावर भगवा फडकण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अटाळी परिसरातील नगरसेविका हर्षाली थविल यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.

महापौरपदासाठी हर्षाली थविल यांच्या नावाची चर्चा केवळ राजकीय समीकरणांमुळे नाही, तर त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळेही राज्यभर लक्ष वेधून घेत आहे. अटाळी परिसरातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या हर्षाली थविल एका साध्या भाड्याच्या घरात राहतात. सामान्य कुटुंबातील महिला शहराची ‘प्रथम नागरिक’ होण्याच्या उंबरठ्यावर आहे, ही बाबच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 

महायुतीचे पारडे जड; मनसेची निर्णायक साथ

शिवसेना (शिंदे गट)ची ताकद केवळ आरक्षणामुळे वाढलेली नाही. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पाच नगरसेवकांसह शिंदे गटाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने महायुतीचे संख्याबळ आणखी भक्कम झाले आहे. भाजपचे 50 नगरसेवक सध्या कोकण भवनात गट नोंदणीच्या प्रक्रियेत असले तरी, महापौरपदासाठी शिंदे गटाकडे हर्षाली थविल आणि किरण भांगले हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यातही अनुभव आणि स्वीकारार्हतेच्या निकषावर हर्षाली थविल यांच्याच नावावर पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आता महापौरपदाऐवजी उपमहापौर आणि स्थायी समितीवर लक्ष केंद्रीत करत ‘पॉवर गेम’ खेळण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा: Eknath Shinde: महायुतीत ऑल इज नॉट वेल? सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी, कारण काय?

3 फेब्रुवारीला निर्णय; अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?

महापालिका प्रशासनाने महापौर निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. 29 आणि 30 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, 3 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष सर्वसाधारण सभेत नव्या महापौरांची घोषणा होणार आहे. पुढील अडीच वर्षांसाठी महायुतीत ‘अडीच-अडीच’ वर्षांचा फॉर्म्युला लागू होण्याची शक्यता आहे, जेणेकरून सत्तेचे संतुलन राखले जाईल.

सत्तेचे समीकरण एका नजरेत पाहिले, तर महापालिकेतील राजकीय चित्र स्पष्ट होत आहे. शिवसेना (शिंदे गट) सर्वाधिक 53 नगरसेवकांसह सर्वात मजबूत स्थितीत असून, महापौरपदावर दावा करण्याच्या दृष्टीने पक्ष आघाडीवर आहे. 50 नगरसेवकांसह भाजपही ताकदीचा घटक ठरत असून, उपमहापौरपदासह विविध महत्त्वाच्या समिती पदांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पाच नगरसेवकांची मनसे सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत आहे. दुसरीकडे, 11 नगरसेवक असलेला शिवसेना (ठाकरे गट) विरोधी बाकावर बसण्याची भूमिका बजावत असल्याने, आगामी सत्तास्थापनेचे गणित अधिक स्पष्ट झाले आहे.

केडीएमसीच्या इतिहासात एका सामान्य घरातील कर्तृत्ववान महिला महापौरपदी विराजमान होतात की शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणे बदलतात, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Ambadas Danve: 'उदय सामंतच भाजपमध्ये जाणार, भाजपने त्यांना...' अंबादास दानवे यांचा मोठा दावा


सम्बन्धित सामग्री