महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील विविध भागांतून हाणामारी, पैसे वाटपाचे आरोप आणि व्हायरल व्हिडिओंमुळे निवडणूक रणधुमाळी अधिकच गडद होत चालली आहे. डोंबिवलीपासून वरळी आणि जळगावपर्यंत घडलेल्या घटनांमुळे प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्थेचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
डोंबिवली पूर्वेकडील तुकारामनगर परिसरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीने परिसरात खळबळ उडाली. पैसे वाटपाच्या संशयावरून दोन्ही गट आमनेसामने आले आणि वादाचं रूपांतर थेट मारहाणीत झालं. या घटनेत दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते जखमी झाले असून काहींना रुग्णालयात दाखल करावं लागलं. भाजपकडून शिवसेनेच्या उमेदवारांवर थेट हल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर शिवसेना शिंदे गटाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. उलट भाजपचेच कार्यकर्ते पैसे वाटताना आढळल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
दुसरीकडे, मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातही निवडणुकीच्या तोंडावर मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यातच पैसे वाटपाचे गंभीर आरोप समोर आले आहेत. महिलांच्या बैठकीच्या नावाखाली रोख रक्कम वाटल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत असून, यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, पक्षांतर्गत नाराजीमुळे अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या माजी पदाधिकाऱ्यांनीच हा व्हिडिओ समोर आणल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या आरोपांमुळे वरळीत निवडणूक प्रचाराला वेगळंच वळण मिळालं असून, निवडणूक आयोगाकडेही तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे.
जळगावमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. येथील एका प्रभागात पैसे वाटप होत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. अपक्ष उमेदवारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. मात्र संबंधित पक्षाकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून, प्रचारासाठी काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या मजुरीचे पैसे दिले जात होते, असा खुलासा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
एकीकडे विकास, सुविधा आणि आश्वासनांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आरोप-प्रत्यारोप, हिंसाचार आणि पैशांच्या राजकारणामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. येत्या काही दिवसांत प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा या प्रकरणांवर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.