नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर रोडवरील फेटरी गाव परिसरात असलेल्या एका ओयो हॉटेलमध्ये प्रेमसंबंधातून घडलेल्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. प्रियकरानेच आपल्या प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृत तरुणीचे नाव रुचिता राजेंद्र भांगे असे असून, तिचा मूळ मुक्काम आष्टी खुर्द, कळमेश्वर येथे आहे. सध्या ती गिट्टीखदान परिसरात वास्तव्यास होती. आरोपी प्रियकराचे नाव सौरभ जामगडे असे आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गुरवारी दोघेही संबंधित ओयो हॉटेलमध्ये दाखल झाले. खोलीत गेल्यानंतर काही वेळातच त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतप्त झालेल्या सौरभने जवळील चाकूने रुचिताच्या गळ्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात रुचिता गंभीर जखमी झाली. तिचा प्रचंड रक्तस्राव झाला आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.