केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना ‘शतक: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, या चित्रपटामुळे संघाचे काम आणि विचार अधिक चांगल्या प्रकारे समजतील.नितीन गडकरी म्हणाले की, “स्वयंसेवक म्हणून मला अनेकदा असे वाटते की संघाबद्दल लोकांच्या मनात जी प्रतिमा आहे आणि प्रत्यक्ष वास्तव यात फरक आहे. त्यामुळे संघाचे विचार, त्याग, समर्पण आणि देशभक्ती जवळून समजून घ्या. आदिवासी भागातील सेवा कार्य, सहकार चळवळ, शिक्षण क्षेत्रातील उपक्रम अशा अनेक कामांचा मोठा पट या माध्यमातून दिसेल. देशाच्या प्रगतीत संघाचा मोठा वाटा आहे. या शताब्दी वर्षानिमित्त आपण सर्वांनी एकत्र येऊन संघ समजून घ्यावा आणि त्याची विचारधारा जाणून घ्यावी. हा चित्रपट जरूर पाहा आणि संघ समजून घेण्याचा प्रयत्न करा.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “या १०० वर्षांत संघाने लाखो तरुणांना देशभक्तीची प्रेरणा दिली आहे. मी देखील त्या स्वयंसेवकांपैकी एक असल्याचा मला अभिमान आहे. आज आपण १०० वर्षांचा टप्पा गाठला असला तरी काम अजून पूर्ण झालेले नाही. भारताला जगात अग्रस्थानी नेणे हे आपले ध्येय आहे. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देश सर्वोच्च स्थानी पोहोचावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.”
हेही वाचा - Yashwantrao Chavan Award Jayesh Mestri : मराठी लेखनाला मोठा सन्मान! जयेश मेस्त्री यांना महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर
हिंदुत्वाबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, “आपण दलित, वंचित आणि गरिबांच्या उन्नतीसाठी काम करतो. हिंदुत्व हे जातीय किंवा सांप्रदायिक नाही. ते कोणत्याही एका धर्माशी जोडलेले नाही. ती एक जीवनशैली आहे. सर्व धर्मांचे लोक भारतीय असू शकतात. आपली भारतीय ओळख ही आपल्या इतिहास, संस्कृती आणि परंपरेतून तयार झाली आहे. हीच प्रेरणा संघाने दिली आहे.”
हेही वाचा - David J Farber Death: तंत्रज्ञान विश्वावर शोककळा, 'इंटरनेटचे जनक' डेव्हिड जे. फार्बर यांचे निधन
‘शतक: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट संघाचा विचारप्रवास, सामाजिक उपक्रम आणि देशसेवा यांचा आढावा घेतो. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनंतर या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.