पुणे महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. राज्यातील सत्तासंघर्ष आणि स्थानिक समीकरणे यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पुण्याच्या निकालाकडे लागलेले असताना, शहरात एक वेगळाच 'ट्रेंड' पाहायला मिळत आहे. मतमोजणी यंत्रे उघडण्यापूर्वीच भाजपच्या काही अतिउत्साही नेत्यांनी विजयाचे गुलाल उधळत थेट 'महापौर' पदाचे फलक झळकावले आहेत.
'नगरसेवक' होण्यापूर्वीच झाले 'महापौर'
या बॅनरबाजीत सर्वाधिक चर्चा होत आहे ती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीचे प्रमुख गणेश बिडकर यांची. प्रभाग क्रमांक 24 मधून नशीब अजमावणारे बिडकर यांचा विजय तर निश्चित मानला जात आहेच, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक पाऊल पुढे टाकत शहराच्या मुख्य चौकांमध्ये त्यांचे ‘महापौर साहेब’ अशा उल्लेख असलेले बॅनर लावले आहेत. बिडकर यांची लढत कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या रवींद्र धंगेकरांचे सुपुत्र प्रणव धंगेकर यांच्याशी आहे. ही 'हायव्होल्टेज' लढत असतानाही कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास सातव्या गगनाला भिडला आहे.
हेही वाचा: Dhule Municipal Corporation Results 2026 : निकालाआधीच खान्देशातील वातावरण तापलं, धुळे महानगरपालिकेत कोण मारणार बाजी?
जुन्या पराभवाचा विसर की विजयाची खात्री?
बॅनरबाजीच्या या शर्यतीत सचिन दोडके यांचे नावही आघाडीवर आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोडके यांच्या समर्थकांनी मतदान प्रक्रिया पार पडताच त्यांच्या विजयाचे फलक लावून अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. विशेष म्हणजे, मागील विधानसभा निवडणुकीत दोडके यांना मोठ्या फरकाने पराभवाचा धक्का बसला होता. मात्र, यावेळी नगरसेवक पदाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा निकालाआधीच जल्लोष सुरू केला आहे.
बाणेरमध्ये कोणाचा 'करिश्मा'?
प्रभाग क्रमांक 9 मध्ये तर कौटुंबिक आणि राजकीय संघर्षाचे टोक पाहायला मिळत आहे. भाजपने विद्यमान नगरसेवक अमोल बालवडकर यांचे तिकीट कापून लहू बालवडकर यांना रिंगणात उतरवले. त्यानंतर अमोल यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून आव्हान उभे केले. निकाल लागण्यापूर्वीच लहू बालवडकर यांच्या समर्थकांनी "जनतेचा विश्वास विजयी झाला" असे फलक लावून विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. इथल्या महत्वपूर्ण लढतीकडे संपूर्ण शहराचे डोळे लागले आहेत.
येत्या काही तासांत ईव्हीएममधून कोणाचे नशीब उघडणार आणि कोणाचे बॅनर खोटे जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कार्यकर्त्यांचा हा अतिउत्साह सार्थ ठरणार की त्यांच्यावर 'बॅकफूट'वर जाण्याची वेळ येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा: ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 'म्हैसूर' पॅटर्न? महानगरपालिकेत शाईवरून झालेल्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय