मुंबईमध्ये महानगर पालिका निवडणुकांची चांगलीच धूम पाहायला मिळाली. भाजपने या निवडणुकांमध्ये मुसंडी मारली असून आता मुंबईचा महापौर कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता राजकीय घडामोडींवर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, जे आकडे आहेत, ते जवळजवळ समसमान आहेत.
पुढे ते म्हणाले की,"सर्वात मोठा पक्ष ज्याने महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष शिवसेना फोडून एक वेगळा गट निर्माण केला. प्रचंड ताकद आणि सत्तेचा वापर करून देखील त्यांना केवळ चारचे बहुमत मिळाले आहे. तुमचं बहुमत कितीही मोठं किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असते", असे त्यांनी म्हटले.
नंतर ते म्हणाले की, "निवडून आलेले जे नगरसेवक आहेत, ते मूळचे शिवसैनिक आहेत. जो शिवसैनिक असतो त्याच्या मनात शिवसेनेबाबत वेगळी भावना आहे. भाजपाचा महापौर होऊ नये हे त्यांच्या मनात आहे हे आम्हाला समजलं आहे. कुणी कितीही कोंडून ठेवलं तरीही इतकी साधनं असतात संपर्काची, दळणवळणाची त्यानुसार संदेश येत असतात. मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचा किंवा शिवसेनेचा व्हावा यापेक्षा भाजपाचा होऊ नये अशी एकनाथ शिंदेंसह असलेल्यांचीही इच्छा आहे. देवाची इच्छा असेल तर महापौर बसू शकतो".