Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मार्चच्या मध्यातच उन्हाचा कडाका वाढला असताना आता काही भागांमध्ये अचानक वातावरणात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज दुपारनंतर राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामानाचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढून अचानक पावसाच्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याउलट राज्यातील उर्वरित भागात मात्र उन्हाचा तडाखा कायम राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Mumbai Water Storage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा? सातही धरणांमध्ये साठा निम्म्यापेक्षा कमी; पुढील काही महिने पाणी जपून वापरण्याचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 17 मार्च रोजी राज्याच्या दक्षिण भागात वादळी पावसाची शक्यता अधिक आहे. कर्नाटक आणि तेलंगणा सीमेलगतच्या भागांमध्ये या बदलाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. यामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर 18 ते 20 मार्चदरम्यान या पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. अधिक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी अनुभवायला मिळू शकतात.
सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याने पिकांचे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा: LPG Consumers In India: LPG वापरात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर? जाणून घ्या कोणत्या राज्यात आहेत सर्वाधिक ग्राहक
21 मार्चनंतर राज्यातील हवामान पुन्हा स्थिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर पुन्हा उन्हाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र सध्या या काही दिवसांत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यातून थोडासा दिलासा मिळू शकतो.
या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने अचानक पडणारा पाऊस आणि गारपीट पिकांचे मोठे नुकसान करू शकते. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पिकांना झाकून ठेवणे, साठवण व्यवस्थेची काळजी घेणे आणि हवामानाचा अंदाज लक्षात ठेवून नियोजन करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.