मुंबई: दिवाळीपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीचा अनुभव येत असला तरी, हा पाऊस शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि हिंगोली भागात मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये राज्याच्या काही भागात, विशेषतः मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर, आता परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरूच राहील. तसेच, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पुढील काही दिवस हवामान परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहे आणि पुढील काही दिवसांत ते उत्तरेकडे सरकण्याची अपेक्षा आहे. हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांच्या मते, 'कोकणापासून विदर्भापर्यंत पाऊस वाढणार आहे. तसेच, राज्यात दमट हवामान अपेक्षित आहे'.
हेही वाचा: Satara Doctor Case : फलटण डॉक्टर अत्याचार प्रकरणात नवीन ट्विस्ट; आरोपी पीएसआय गोपाल बदने अखेर पोलिसांसमोर हजर
26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर, नाशिक, लातूर, नांदेड आणि संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 'सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रात वादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे, 'मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये', असे आवाहन करण्यात आले आहे आणि मासेमारी पूर्णपणे थांबली आहे. देवगड आणि गुजरातच्या किनाऱ्यावर अनेक बोटी आश्रय घेत आहेत.