मुंबई: महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज, शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत आहे. राज्याच्या राजकीय पटलावर 'मिनी विधानसभा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी मतदान होत असून, एकूण 7,438 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. 'जिल्ह्याचा कारभारी' निवडण्यासाठी ग्रामीण मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी रोजी या निवडणुकीची घोषणा केली होती. मूळ वेळापत्रकानुसार 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यावर ओढवलेल्या शोककळेमुळे आणि जाहीर झालेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू झाली असून सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होऊन निकालांचे चित्र स्पष्ट होईल.
या निवडणुकीत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत महिलाशक्तीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या 731 जागांपैकी 369 जागा महिलांसाठी राखीव आहेत, तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांपैकी 731 जागांवर महिला उमेदवारांचे वर्चस्व असणार आहे. सामाजिक समीकरणांचा विचार करता अनुसूचित जाती, जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठीही मोठ्या प्रमाणावर जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: Dharashiv Zilla Parishad Election 2026 : 55 गटांसाठी 967 उमेदवार रिंगणात, चुरशीची लढत रंगणार
राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2,624 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. स्थानिक मुद्यांपासून ते राज्याच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांपर्यंत सर्वच विषयांवर प्रचाराचा धुराळा उडाला होता. आजच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून संवेदनशील केंद्रांवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. "लोकाशाहीचा हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडावे," असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.
निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) कंबर कसली आहे. केवळ पुणे विभागातूनच 535 बसचे नियोजन मतपेट्यांच्या वाहतुकीसाठी करण्यात आले आहे. शुक्रवारी या बस केंद्रावर पोहोचवण्यात आल्या असून, आज मतदान प्रक्रिया संपल्यानंतर पुन्हा याच बसच्या मदतीने मतपेट्या संकलन केंद्रांवर आणल्या जातील. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील नियमित एसटी बस फेऱ्यांवर काहीसा परिणाम झाला असून, प्रवाशांना थोडी गैरसोय सोसावी लागत आहे. मात्र, लोकशाहीच्या या मोठ्या कर्तव्यासाठी नागरिकही सहकार्य करताना दिसत आहेत.
एकूणच, थंडीच्या कडाक्यातही राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. सत्तेची समीकरणे कोणाच्या बाजूने झुकणार आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 9 फेब्रुवारीच्या निकालाकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत.
हेही वाचा: Sindhudurg Zilla Parishad Election 2026 : चार वर्षांनंतर जिल्ह्याच्या राजकारणाला मिळणारा नवा श्वास; सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजकीय इतिहास जाणून घ्या