बीड: परळी येथील टोकवाडी परिसरात शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण करण्याची घटना घडली होती. सध्या, त्याच्यावर अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पीडित शिवराज दिवटेला भेट दिली. यावेळी, त्यांनी पीडित शिवराज यांच्याशी संवाद साधत त्याला धीर देत म्हणाले की, 'आम्ही तुझ्या पाठीशी आहोत'. तसेच, 'या प्रकरणात दोषी आरोपींविरुद्ध लवकरात लवकर कारवाई व्हावी', अशी मागणी केली.
हेही वाचा: महाराष्ट्रातील 'या' 7 खासदारांना मिळाला संसदरत्न पुरस्कार
काय म्हणाले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील?
'पीडित शिवराजच्या अंगावरील मारहाणीचे वळ पाहून माझ्या अंगावर काटा येतो. सामूहिक कट रचून त्याला जीव घेण्यासाठीच त्याचे अपहरण करण्यात आले होते. मात्र, या घटनेवेळी लोक धावून आल्यामुळे त्याचा जीव वाचला. अशा घटना सतत होत असतानाही सरकार काही करत नाही. किती दिवस आम्ही शांत राहू? वाढती गुंडगिरी थांबवण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. बीड जिल्ह्यातील सर्व घराणे आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांसोबत चर्चा करून पुढील पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. आता गुंडांचा माज उतरवावा लागेल. इथून पुढे मी कमी बोलणार, जास्त काम करणार', असा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा: कारखाना चालवण्याची धमक असलेल्यांनाच मतदान करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मतदारांना आवाहन
चौकशीच्या फेऱ्यात येऊ नका:
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी द्यकीय प्रशासनाला इशारा देत म्हणाले, 'शिवराजला खूप मार लागला आहे. तो अत्यंत गंभीर जखमी आहे. इतकं असूनही डॉक्टर म्हणतात त्याला फक्त मुक्का लागला आहे. जर आरोपीला वाचवण्यासाठी कोणावर दबाव असेल तर घाबरू नका. तुम्ही विनाकारण चौकशीच्या फेऱ्यात अडकलो नाही पाहिजे'.