Sunday, July 13, 2025 11:06:27 AM

नालासोपाऱ्यात शाळा संचालिकेला मनसे महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण

तुळींजमधील शाळेत दाखल्याच्या वादातून मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ, संचालिकेला मारहाण. दाखल्याच्या विलंबामुळे पालक संतप्त; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली.

 नालासोपाऱ्यात शाळा संचालिकेला मनसे महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण

नालासोपारा: नालासोपाऱ्यातील तुळींज परिसरात मदर वेलंकनी शाळेत दाखल्याच्या वादातून मोठा गोंधळ झाला. शाळेतील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यात उशीर होत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महिला कार्यकर्त्यांनी शाळेच्या संचालिका आशा डिसोजा यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना घडली.

हेही वाचा: गोगावले यांच्या अघोरी पूजेमुळे खळबळ; नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, आवश्यक असलेला शाळा सोडल्याचा दाखला वेळेवर न मिळाल्याने पालकांमध्ये संतापाची भावना होती. या तक्रारींनंतर मनसेचे कार्यकर्ते शाळेच्या आवारात पोहोचले. यावेळी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी बाहेरील लोकांना शाळेच्या हद्दीबाहेर जाण्याचा आग्रह केला. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले व वादाला सुरुवात झाली.

हेही वाचा:राणे बंधूंमध्ये नव्या वादाची ठिणगी; सोशल मीडियावर 'तो' स्क्रीनशॉट शेअर करत म्हणाले...

यावेळी महिला कार्यकर्त्यांनी शाळेच्या संचालिकेला धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच शाळेच्या परिसरात गोंधळ घालण्याचा व तोडफोड करण्याचा प्रयत्नही झाला. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री