Manoj Jarange With Bacchu Kadu : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे भव्य शेतकरी आंदोलन सुरू आहे. यात आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या बाजूने उडी घेण्याचे निश्चित केल्यामुळे राज्य सरकारचे टेन्शन वाढले आहे. सरसकट कर्जमाफी आणि अतिवृष्टी अनुदानासह विविध 22 मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.
आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे पूरामध्ये अगदी मुलांचे दप्तर सुद्धा वाहून गेले. शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मी आंदोलनात आलो. आंदोलनावर सरकारने काल न्यायालयाचा डाव टाकला म्हणून मी बाहेर पडलो. षडयंत्राला आणि डावाला प्रतिडावानेच उत्तर द्यावे लागेल. शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकतो आहे. आंदोलन कसं करायचं याचे सल्ले मी देऊ शकत नाही. कारण त्यांचे आंदोलन वेगळे आहे. पण आंदोलनाचा मूळ गाभा हा आंदोलक असतो. आज बच्चू कडू यांची सरकारसोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर काय निर्णय होतो ते बघू, अशी भूमिका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
बच्चू कडू यांनी देखील जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्याबद्दल भावना व्यक्त केल्या. मनोज जरांगे जरी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे असले, बहुतांशी वैदर्भीय शेतकरी ओबीसी असले, तरी आज जरांगे पाटील शेतकरी हितासाठी या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे इथे त्यांच्या येण्याला जातीच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही, म्हणून जरांगे पाटील यांचं आम्ही स्वागत करतो असेही बच्चू कडू म्हणाले. दरम्यान परसोडीच्या मैदानावर प्रशासनाने कुठलीच व्यवस्था केली नाही, प्रशासन नेहमीच आंदोलकांना आपला शत्रू समजते. त्यामुळेच परसोडीच्या मैदानावर गैरव्यवस्था झाली अशी नाराजी ही बच्चू कडू यांनी व्यक्त केली. 'मुख्यमंत्र्यांनी चर्चेला मुंबईत बोलविले आहे. मी आणि सहा जणांचे शिष्टमंडळ जात आहोत. काही निर्णय होतील, घेतले जातील ते कोणाला पटणार नाहीत, कोणाला पटतील. आपण आंदोलन उभारले आहे. ते सोपे नाही. परंतू, आंदोलनाच्या मूळ मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही,' असे शेतकरी आंदोलनाचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि अखिल भारतीय किसान सभेचे नेते अजित नवले यांसारख्या विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. आता या आंदोलनात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचीही 'एन्ट्री' झाल्याने आंदोलनाला मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांशी आज भेट
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनामुळे नागपुरात चार महत्त्वाच्या महामार्गांची वाहतूक ठप्प झाली होती, ज्यामुळे मोठा दबाव निर्माण झाला. कोर्टातही याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल झाली होती. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारचे शिष्टमंडळ, ज्यात मंत्री पंकज भोयर आणि अर्थ राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांचा समावेश होता, त्यांनी रात्री आठ वाजता नागपूरमधील खापरी येथे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. जवळपास तासभर ही चर्चा चालली. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची (Meeting with CM) विनंती केल्यानंतर बच्चू कडूंची मनधरणी करण्यात यश आले. त्यानुसार, बच्चू कडू यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.
हेही वाचा - कोर्टाच्या आदेशानंतरही बच्चू कडू आंदोलनावर ठाम, संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांनाही माघारी पाठवलं
जरांगे पाटील तातडीने नागपूरला पोहोचले
शेतकरी मायबापासाठी ही अटीतटीची लढाई आहे, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या संघर्षाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, "ज्यावेळेस अटीतटीची वेळ असते, त्यावेळेस आपण आपल्या शेतकरी मायबापांसाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे." शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब आणि दिव्यांग बांधवांसाठी खमकेपणे आणि खंबीरपणे उभे राहण्याच्या उद्देशाने आपण तातडीने नागपूरकडे रवाना होत असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. यानंतर ते आंदोलनस्थळाकडे रवाना झाले होते.
आंदोलनाची पुढील दिशा आणि इशारा
बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा झाली असली तरी, आंदोलन शांततेत सुरूच ठेवणार असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. आपली मुख्य मागणी सरसकट कर्जमुक्ती (Loan Waiver) ची आहे. चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांकडे जात असताना आंदोलकांना प्रशासनाकडून कोणताही त्रास होणार नाही, अशी खात्री त्यांनी घेतली. मात्र, चर्चेत कर्जमुक्तीची तारीख सांगितली नाही, तर परत येऊन रेल्वे रोखू, असा उघड इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर आंदोलन थांबवायचे की सुरू ठेवायचे, हे ठरवले जाईल. दरम्यान, राज्यातील सर्व तहसील कार्यालयात प्रहारचे कार्यकर्ते कर्जमाफीबद्दल मागणीचे निवेदन तहसीलदारांना (Memorandum to Tehsildar) देतील, असेही त्यांनी जाहीर केले.
नागपूरकरांना दिलासा; आंदोलन मैदानात स्थलांतरित
बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली होती आणि नागपूरकरांची गैरसोय होत होती. आता हे आंदोलन महामार्गावरून परसोडीच्या मैदानावर (Parsodi Ground) हलवले जाणार आहे. आंदोलन मूळतः ज्या मैदानावर निश्चित केले होते, त्याच मैदानावर ते जाईल. महामार्गावरील सर्व ट्रॅक्टर आणि वाहने हटवून ती परसोडी मैदानावर आणली, ज्यामुळे वाहतूक कोंडीचा (Traffic Jam) प्रश्न सुटेल.
हेही वाचा - PM Kisan Yojana: आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात