जालना: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे 29 जून रोजी सकाळी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसह इतर विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होणार असून, पुढील आंदोलनाची दिशा यावेळी ठरवली जाणार आहे. या बैठकीत मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाच्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलकांनी पुन्हा एकदा सक्रिय भूमिका घेतली आहे. या मागण्यांमध्ये ‘मराठा आणि कुणबी एकच’ या संदर्भातील अध्यादेशाची अंमलबजावणी, जुने गॅझेटियर लागू करणे, 'सगे-सोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, बलिदान देणाऱ्या कुटुंबांना मदत, आणि कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी अशी महत्त्वाची सूत्रे आहेत.
हेही वाचा: वैजापूरमध्ये महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून हत्या
यापूर्वी 2016 साली राज्यभरात मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला होता, ज्यात लाखो लोकांनी शांततेने सहभाग घेतला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलनाचे रूपांतर उपोषण आणि आत्मदहनात झाले. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2023 मध्येही उपोषण झाले, ज्यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला.
जरांगे पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर 1 ऑगस्टपर्यंत शासनाने ठोस निर्णय घेतला नाही, तर 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत मोठे आंदोलन छेडले जाईल. त्यामुळे 29 जूनची बैठक निर्णायक ठरणार आहे.