छत्रपती संभाजीनगर: पुण्यातील वैष्णवी हगवणे हिचे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच पैशांची मागणी करत विवाहितेला पतीने घरात डांबून, दोरीने बांधून, शोल्डर गरम करून चटके दिले. ही निर्दयी घटना छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी येथे घडली. या प्रकरणी विवाहितेने फुलंब्री ठाण्यात पती व दोन नणंदांविरोधात तक्रार दिली आहे. वैद्यकीय अहवालात महिलेच्या अंगावर 17 जखमा आढळून आल्या आहेत.
विवाहित महिलेच्या माहेरी लग्न असल्याने तिचे वडील तिला घेण्यासाठी बुधवारी गेले होते. यावेळी हिना एका खोलीत डांबून ठेवलेल्या अवस्थेत दिसून आली. विचारपूस केली असता हिनाने वडिलांना रडत रडत घडलेली घटनेची माहिती दिली. यावेळी हिनाला दोरीने बांधून, शोल्डर गरम करून गळ्यावर, दोन्ही हातावर, पायावर व शरीराच्या अनेक भागांवर सतरा ठिकाणी निर्दयीपणे चटके दिलेले दिसले.
हेही वाचा : सुनिता जामगडे गुगल मॅपद्वारे पाकिस्तानात; दोन तासांत एलओसी पार केल्याचं समोर
वडिलांनी हिनाला सोबत घेऊन पती अजिम शेख, नणंद शबाना निसार शेख (रा. हडको कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर) व दुसरी नणंद रिजवाना ईमरान शेख यांच्याविरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.