पुणे : नराधम राजेंद्र हगवणेच्या कुटुंबानं फक्त वैष्णवीचाच जीव घेतला नाही, तर मोठी सून मयुरी जगताप-हगवणे हिलाही खूप छळलं होतं. पैशांसाठी हगवणे कुटुंबानं मयुरीलाही वारंवार छळलं. मयुरी जगतापनं धीर धरत माध्यमांसमोर येत मोठ्या हिम्मतीनं आपली कहाणी जगासमोर आणली. मयुरीनं सांगितलेली आपबीती अंगावर काटा आणणारी आहे.
वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात हव्यासी तसेच जुलुमी हगवणे कुटुंबाविरोधात संतापाची एकच लाट उठली. वैष्णवीच्या अंत्संस्कारानंतर तिच्या चितेची राख थंडावते न् थंडावते तोच हगवणे कुटुंबाची दुसरी काळी बाजू समोर आली, त्याला कारणीभूत ठरली ती हगवणेंची मोठी सून आणि वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी जगताप-हगवणे. हगवणे कुटुंबीयांकडून मोठी सून मयुरी जगताप हिलादेखील मारहाण करण्यात येत होती. त्यांची खाष्ट नणंद करिश्मा आणि शशांक हगवणे यांनीच तिला सर्वाधिक मानसिक तसेच शारीरिक त्रास दिल्याचा खळबळजनक आरोप मयुरी जगताप हिनं माध्यमांसमोर केलाय. तिचा पती सुशील तिच्या बाजूनं असतानाही दिर शशांक आणि नणंद करिश्मासह सासू लतानंही वारंवार मारहाण केल्याचा गंभीर आरोप मयुरीनं केलाय.
एवढचं नाही, तर साऱ्या घरात मोठी नणंद करिश्माची ताईगिरी तसेच वट चालायची. मयुरीचा नव्हे तर तिचा पती सुशीललादेखील करिश्मा आणि शशांक मारायचे आणि त्याचं खच्चीकरण करायचे असा गंभीर आरोप मयुरीनं लावलाय, शिवाय नवी सून वैष्णवीसोबत आपल्याला बोलू दिलं जायचं नाही, त्यामुळं वैष्णवीला सहारा देत वेळीच सावध करता आलं नाही अशीही खंतही मयुरी व्यक्त करते.
हेही वाचा : मुंबई महानगरातील नालेसफाई 7 जूनपर्यंत पूर्ण करावी; उपमुख्यमंत्र्यांकडून निर्देश
हगवणे कुटुंबीयांनी माझ्या मुलीलाही मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. शशांक हगवणे, करिश्मा हगवणे आणि लता हगवणे यांनी तिला वारंवार त्रास दिला. मात्र,माझ्या मुलीने त्रास होत असल्याची माहिती वेळोवेळी दिली होती. त्रास दिला जातोय, मारहाण होतोय, असे ती नेहमी सांगायची. या प्रकरणी आम्ही दोन-तीन वेळा कुटुंबीयांसोबत बैठक घेतली आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. आम्ही मुलीला समजावूनही सांगितलं. तिनं काही काळ ते सहन केलं,पण सहनशीलतेलाही एक मर्यादा असते. जेव्हा ती मर्यादा ओलांडली, तेव्हा तिच्यासाठी ते सहन करणे अशक्य झालं आणि गेल्या दीड वर्षांपासून मयुरी जगताप ही हगवणे कुटुंबापासून फारकत घेत वेगळी राहतेय, असं काळं सत्य मयुरीच्या आईनं उघड केलंय.
मयुरीच्या आईच्या तक्रारीत काय?
राजेंद्र,लता हगवणेंची मयुरीकडे फॉर्च्युनरची मागणी केली.पती घरी नसताना मयुरीला अमानुष मारहाण करण्यात आली. सासरे,सासू,नणंद, दीराकडून वारंवार मारहाण करण्यात आली. मयुरीला वडील नसल्यानं अपंग भाऊ,आईस जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. राजेंद्र हगवणे हे मेहुणा मोठा पोलीस अधिकारी असल्याची धमकी द्यायचे. पौड पोलिसांनी मध्यस्थी केली नंतर मयुरीला कपडेफाडून मारहाण केली. सासऱ्यांनी मयुरीच्या छातीला हात लावला,दिरानं अवघड जागी लाथ मारली अशी तक्रार मयुरीच्या आईने केली
मयुरीसारखीच हिम्मत दाखवत आणि मनाचा दृढ संकल्प करत वैष्णवी उभी ठाकली असती आणि पोलिसांनीही वेळीच दखल घेत राक्षसीवृत्तीच्या हगवणे कुटुंबाला धडा शिकवला असता, तर एक जीव वाचला असता अन् एक अवघं 10 महिन्यांचं चिमुरडं आपल्या आईपासून दुरावलं गेलं नसतं.