मध्य रेल्वेने रविवार, 22 फेब्रुवारी रोजी मुंबई विभागात मेगाब्लॉक जाहीर केला असून प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलच्या वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेगाब्लॉकमुळे काही गाड्या उशिरा धावण्याची, काही गाड्या रद्द होण्याची किंवा मार्ग बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना अतिरिक्त गर्दीचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः कामावर जाणारे नागरिक आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. रविवारी 22 फेब्रुवारी 2026 रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी मध्य रेल्वेच्या मुलुंड ते ठाणे अप व डाउन धीम्या मार्गावर तसेच हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचसोबत पश्चिम रेल्वेवर वसई ते विरार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.
हेही वाचा- Ahilyanagar Crime News: नोकरीचे आमिष दिले, VCवर कपडे काढायला सांगायचा, तासनतास... NCP नेत्यावर 25 वर्षीय तरुणीचा गंभीर आरोप
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेवर मुलुंड ते ठाणे अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहणार असून सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाउन धीम्या लोकल मुलुंड ते ठाणे दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे स्थानकावर त्या पुन्हा धीम्या मार्गावर आणल्या जातील. तसेच कल्याणहून सकाळी 10.36 ते दुपारी 3.24 दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या लोकल ठाणे–मुलुंड दरम्यान जलद मार्गावरून चालवण्यात येणार असून या लोकल 10 मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक
पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहणार असून या कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सकाळी 10.33 वा. ते दुपारी 3.49 पर्यंत तसेच सीएसएमटीहून बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन लोकल सकाळी 9.45 वा. ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत रद्द राहतील. ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून ठाणेकडे जाणाऱ्या अप सेवा आणि ठाणेहून पनवेलकडे जाणाऱ्या डाउन सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येतील. ठाणे - वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा उपलब्ध राहतील. पोर्ट लाईनवरील सेवा नियमित सुरू राहतील. यामुळे हार्बर मार्गावर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
हेही वाचा- Hingoli Farmers : "माझी विहीर चोरीला गेली", हिंगोलीतील धक्कादायक प्रकार समोर! तब्बल 80 शेतकऱ्यांच्या विहिरी चोरीला?
वसई रोड-विरार, बोरिवली-दहिसर रेल्वेवर परेचा नाइट मेगा ब्लॉक
21 आणि 22 फेब्रुवारी रोजी वसई रोड आणि विरार स्थानकांदरम्यान रात्री 12.15 ते 04.15 पर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गांवर चार तासांचा मेगा ब्लॉक जारी करण्यात आला आहे. देखभाल आणि दुरुस्तीसाठी तसेच नवीन फूट ओव्हर ब्रिजच्या गर्डर लॉन्चिंगसाठी बोरिवली आणि दहिसर स्थानकांदरम्यानच्या सर्व मार्गांवर 02.10 ते 04.10 पर्यंत ब्लॉक पश्चिम रेल्वेने जाहीर केला आहे. यावेळी वसई रोड आणि विरार स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील सर्व उपनगरीय गाड्या जलद मार्गांवर चालवल्या जाणार आहेत.
खारबाव येथे मध्य रेल्वेचा रात्र कालीन ब्लॉक नवीन अप आणि डाउन मालवाहू मार्ग सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने खारबाव येथे रात्र कालीन वाहतूक व पॉवर ब्लॉक जाहीर केल्यामुळे वसई ते दिवा आणि वसई ते पनवेल या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. यावेळी सात फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ब्लॉक कालावधीत या मार्गावरून धावणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्या 25 ते 30 मिनिटे उशिराने धावतील.