ST Employees Salary: आपल्या अथक कष्टाने महाराष्ट्र जोडणाऱ्या सुमारे 86,000 एसटी कर्मचाऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. वेतनवाढीचा प्रलंबित असलेला हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला असून, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
निधीची अडचण आणि तातडीची तरतूद
एसटी महामंडळाला सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने थकीत वेतन देणे जिकिरीचे झाले होते. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाने तातडीने 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. यामुळे फेब्रुवारी महिन्याची थकीत वेतनवाढ कर्मचाऱ्यांच्या पदरात पडली आहे. "हा केवळ आकडा नसून कष्टकऱ्यांप्रति असलेली शासनाची संवेदनशीलता आहे," असे मत मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.
प्रकरणाची पार्श्वभूमी आणि पाठपुरावा
ऑक्टोबर 2025 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सहमतीने कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा 65 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे निश्चित झाले होते. डिसेंबरपासून ही प्रक्रिया सुरू झाली, मात्र तांत्रिक आणि निधीच्या अडचणींमुळे फेब्रुवारीचा हप्ता रखडला होता. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मंत्री सरनाईक यांनी या प्रश्नावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून 210 कोटींची मागणी केली, ज्यातील 100 कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून घेण्यात त्यांना यश आले.
हेही वाचा - Bhigwan Kidnapping Case Update : भिगवण प्रकरणातील तरूणीचा 'यू टर्न', म्हणाली, 'आता मला आईकडे...'
24 फेब्रुवारीला खात्यात जमा झाली रक्कम
दरम्यान, 24 फेब्रुवारी रोजी हा थकीत हप्ता जमा होताच एसटी कर्मचाऱ्यांमधील नाराजी दूर झाली आहे. उर्वरित 110 कोटींची रक्कमही लवकरच महामंडळाला प्राप्त होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. ऐन अडचणीच्या काळात हक्काचे पैसे मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार आणि विशेषतः मंत्री सरनाईक यांचे आभार मानले आहेत.