Wednesday, June 18, 2025 02:35:15 PM

मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाटवर विवाहितेचे गंभीर आरोप; फसवणूक, छळ आणि जबरदस्ती गर्भपाताचा दावा

मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांच्यावर विवाहित महिलेचा गंभीर आरोप; मानसिक-शारीरिक छळ, फसवणूक, धमकी व जबरदस्ती गर्भपात केल्याचा दावा; कायदेशीर कारवाईची मागणी.

मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाटवर विवाहितेचे गंभीर आरोप फसवणूक छळ आणि जबरदस्ती गर्भपाताचा दावा

Sanjay Shirsat son Sindhant Shirsat : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्याविरोधात एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या महिलेने ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावत सिद्धांत शिरसाट यांनी मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक, धमकी व हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख सिद्धांत शिरसाट यांच्याशी झाली. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि चेंबूर येथील फ्लॅटमध्ये प्रत्यक्ष भेटी होत शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. सिद्धांत यांनी आत्महत्येच्या धमक्यांद्वारे तिला भावनिक ब्लॅकमेल करून लग्नासाठी भाग पाडले. महिलेनुसार, त्यांनी 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने लग्न केले असून त्याचे सर्व पुरावे तिच्याकडे आहेत.

नोटीसनुसार, या संबंधातून महिलेला गर्भधारणाही झाली होती, मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने तिचा गर्भपात करवून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. लग्नानंतर सिद्धांत यांच्या वागणुकीत मोठा बदल झाला. त्यांनी महिलेला चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला. त्यांचे अन्य महिलांशी संबंध उघड झाल्यावर त्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. 'पोलिसांकडे गेलीस तर आत्महत्या करीन आणि तुझे कुटुंब उध्वस्त करीन,' अशा स्वरूपाच्या धमक्याही दिल्याचे महिलेनं सांगितले आहे.

या प्रकरणी संबंधित महिलेने 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र मंत्री पुत्र असल्यामुळे पोलिसांनी कारवाई टाळल्याचा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला आहे. महिलेनं सिद्धांत यांनी सात दिवसांच्या आत तिला घरी नेऊन नांदवावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

महिला हक्क कार्यकर्त्यांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपामुळे पीडितेला न्याय मिळण्यात अडथळे येत असल्याचे सांगितले आहे. मंत्री पुत्र असल्याच्या आधारावर कायद्याचे उल्लंघन करून महिलेला अन्याय सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.


सम्बन्धित सामग्री