Saturday, February 14, 2026 04:57:13 AM

BMC Election 2026: भाजप - एमआयएम युतीवर शिंदेंनी सोडले मौन; स्पष्टचं म्हणाले मुख्यमंत्र्यांसोबतच्या त्या चर्चेनंतर...

नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने चांगली कामगिरी केली असून, त्याचाच परिणाम महानगरपालिका निवडणुकांतही दिसून येईल आणि जनता शिवसेनेलाच कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

bmc election 2026 भाजप - एमआयएम युतीवर शिंदेंनी सोडले मौन स्पष्टचं म्हणाले मुख्यमंत्र्यांसोबतच्या त्या चर्चेनंतर

मुंबई: मीरा - भाईंदर येथे झालेल्या प्रचार कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. भाजप–एमआयएम युतीच्या चर्चांपासून ते शिवसेनेच्या विकासकेंद्रित अजेंड्यापर्यंत अनेक विषयांवर बोलताना त्यांनी पक्षाची दिशा आणि भूमिका मांडली.

शिवसेना ही कामाच्या जोरावर निवडणुका जिंकणारी पक्ष असून, मीरा - भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर विजय मिळवेल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अनेक ठिकाणी आम्ही युतीसाठी प्रयत्न केले, युतीची विचारणा देखील केली, मात्र काही ठिकाणी युती होऊ शकली नाही. तरीही शिवसेना आपल्या कामगिरीच्या जोरावर जनतेचा विश्वास जिंकत आहे.

यावेळी त्यांनी मीरा - भाईंदरमधील विकासकामांबाबत बोलताना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या विकासकामांचे विशेष कौतुक केले. हॉस्पिटल, रस्ते, आरोग्य सुविधा, कॅशलेस उपचार व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधांमुळे मीरा - भाईंदर शहराचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाल्याचे त्यांनी सांगितले. “आमचा अजेंडा एकच आहे, विकास, विकास आणि फक्त विकास. इतरांचा अजेंडा वेगळा असू शकतो. मात्र गेल्या दहा वर्षांत मीरा - भाईंदरमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून, शहराचा चेहरामोहरा बदलला आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: BMC Election 2026: 'लाव रे तो व्हिडिओ'ला भाजपचं 'काढ रे तो फोटो'ने उत्तर; अमित साटम राज ठाकरेंना म्हणाले ढोंगी आणि ...

मी मुख्यमंत्री असताना मीरा - भाईंदरसाठी मोठ्या प्रमाणावर विकास निधी दिला असल्याचे सांगत, आज लोक काम पाहत आहेत. लोकांना विकास हवा आहे; इतर गोष्टींमध्ये जनतेला रस नाही, असेही त्यांनी नमूद केले. राज ठाकरे तुमच्या विरोधात बोलत आहेत, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाहीत कोणी कोणावर काय बोलावे, हे त्यांनी वैयक्तिकरित्या ठरवावे. जनतेला मात्र काम आणि विकास महत्त्वाचा वाटतो. नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने चांगली कामगिरी केली असून, त्याचाच परिणाम महानगरपालिका निवडणुकांतही दिसून येईल आणि जनता शिवसेनेलाच कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, एक्सेसिबिलिटी, क्रेडिबिलिटी आणि सिंपल अ‍ॅप्रोच या तीन गोष्टींवर मी काम करतो. मला कोणीही सहज भेटू शकते आणि त्यामुळेच आम्ही जनतेमध्ये प्रिय आहोत. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

अकोट येथील भाजप - एमआयएम युतीबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती. मुख्यमंत्री म्हणाले की, हा निर्णय त्यांच्या परस्पर झालेला आहे. मात्र अशा प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनी तातडीने सूचना देत कारवाईचे आदेश दिलेले असतात. काही गोष्टी पक्षाच्या खालच्या पातळीवर घडत असतात, परंतु शिवसेना कधीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी महायुतीच विजय मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. येणाऱ्या काळात मीरा - भाईंदरसह मुंबई महानगरपालिका निवडणुका राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार असून, विकास हाच शिवसेनेचा मुख्य मुद्दा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Stray Dog Attack: आधी हात तोडला, नंतर आईसमोरच फाडून खाल्लं... चारा आणायला गेलेल्या 9 वर्षांच्या चिमुरडीचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात करुण अंत


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या